Join us  

अ‍ॅसिड हल्ल्याला बळी पडली होती कंगनाची बहिण रंगोली, 'छपाक'मधील दीपिकाचा लूक पाहून झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 8:05 PM

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच 'छपाक' चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच 'छपाक' चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील दीपिकाच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या लूकची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होते आहे. त्यात अभिनेत्री कंगना रानौतची बहिण रंगोल चंडेलने छपाकच्या पोस्टरवर प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

कंगनाची बहिण रंगोलीदेखील अ‍ॅसिड हल्ल्याला बळी पडली होती. त्यामुळे दीपिकाचा 'छपाक'मधील लूक पाहिल्यानंतर रंगोलीला तिच्या त्या वाईट दिवसांची आठवण झाली. तिने छपाकचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून म्हटले की, जगात कितीपण अन्याय किंवा भेदभाव होऊ दे. ज्या गोष्टीचा द्वेष करतो त्याला तसेच उत्तर दिले नाही पाहिजे. दीपिका पादुकोण व मेघना गुलजार यांचे काम कौतुकास्पद आहे. मी स्वत: एक अ‍ॅसिड हल्ला पीडित असल्यामुळे या चित्रपटाच्या बाजूने खंबीरपणे उभी राहीन.

 

रंगोलीने एका मुलाखतीत तिच्यावर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याबाबत सांगितले होते. एकतर्फी प्रेमातून माझ्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. माझ्या एका डोळ्याची ९० टक्के दृष्टी गेली आहे. अ‍ॅसिड हल्ल्यानंतर अन्ननलिका आणि श्वसननलिकेत अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे आयुष्याशी स्ट्रगल करावा लागला. जवळपास तीन महिने मी आरशासमोर गेले नव्हते. अ‍ॅसिड हल्ल्यात जळलेल्या माझ्या चेहऱ्यावर ५७ वेळा सर्जरी करावी लागली. अवघ्या २३ व्या वयात मला मानसिक तणावाला सामोरे जावे लागले होते. अ‍ॅसिड हल्ला पीडितांना कोणतीही चूक नसताना उगाच शिक्षा भोगावी लागते, अशी खंत व्यक्त केली होती.

टॅग्स :कंगना राणौतरांगोळीदीपिका पादुकोणछपाक