काजोल (Kajol) ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. सध्या काजोल तिच्या आगामी 'मॉ' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आपल्या मुलीचं रक्षण करण्यासाठी कुठल्याही टोकाला जाण्यास तयार असलेल्या एका आईची भूमिका तिनं साकारली आहे. हा चित्रपट येत्या २७ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने काजोल नुकतीच कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. गुरुवारी सकाळी मंदिरात प्रार्थना करतानाचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने भारतीय सैन्याने दहशतवादाविरुद्ध सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'वर आपली प्रतिक्रिया दिली. तिने म्हटले, "मी सशस्त्र दलांचा आदर करते आणि देशासाठी त्यांनी केलेल्या सेवेबद्दल मनापासून आभार मानते".
काजोलच्या आधी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी 'ऑपरेशन सिंदूर'ला पाठिंबा दिला आहे आणि भारतीय सैन्याचे कौतुक केलं आहे. काजोलचा पती आणि अभिनेता अजय देवगण यानेही यावर आपलं मत माडलं होतं.अजय देवगण म्हणाला होता की, 'कोणालाही युद्ध नको आहे, पण दुसरा पर्याय उरला नाही. मी आपल्या भारतीय सशस्त्र दलांना सलाम करतो. पंतप्रधान मोदी आणि सरकार यांनाही माझा सलाम. कारण, त्यांनी जे करायला हवं होतं तेच केले. त्यांनी खरोखरच खूप चांगलं काम केलं आहे", या शब्दात अभिनेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्याने पीओके आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते.