जान्हवीचा हा व्हिडीओ तिची डान्स ट्रेनर चारवी भारद्वाज हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मिळाला आहे. व्हिडीओमध्ये चारवी ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. चारवी डान्स करीत असतानाच तिच्या मागे जान्हवी एंट्री करीत काही डान्स मुव्स करताना दिसते. या व्हिडीओमध्ये जान्हवी काही सेकंदच डान्स करीत असली तरी तिच्यातील लकब बघून ती बॉलिवूड एंट्रीसाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे हेच सिद्ध होते. त्याचबरोबर जान्हवीच्या या अदा बघून तीदेखील तिच्या आईप्रमाणेच उत्कृष्ट डान्सर म्हणून स्वत:ला सिद्ध करेल हे दिसून येते.
असो, जान्हवीच्या ‘धडक’ या डेब्यू चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन हाउसअंतर्गत केली जात आहे. चित्रपटात शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे, तर चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान करीत आहेत. ‘धडक’ हा चित्रपट मराठीतील ब्लॉकबस्टर ‘सैराट’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार असून, जान्हवीच्या अदा प्रेक्षकांना भावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.