John Abraham Donald Trump Tariff: अमेरिका आणि भारत यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. व्हाईट हाऊसने भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के कर (Tariff) लादण्याचा कार्यकारी आदेश जारी केला आहे. यामुळे एकूण कर आता ५० टक्के होणार आहे. सुरुवातीचा २५ टक्के कर ७ ऑगस्टपासून लागू झाला आहे. तर पुढचा २५ टक्के कर हा २१ दिवसांत लागू केला जाणार आहे. ७ ऑगस्टपासून भारतातून निघालेल्या व हा माल जेव्हा अमेरिकेच्या बंदरांमध्ये प्रवेश करेल तेव्हा सर्व भारतीय वस्तूंवर हा कर लावला जाणार आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आता बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम यानं या संपुर्ण प्रकरणावर भाष्य केलंय.
जॉन अब्राहम सध्या 'तेहरान' या आगामी OTT चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'च्या आयडिया एक्सचेंज शोमध्ये जॉनने अमेरिका-भारत संबंधांबद्दल आपलं मत व्यक्त केलं. त्याने अमेरिकेने भारतावर लावलेल्या ५०% कर धोरणावर टीका करत म्हटलं, "अमेरिकेचा शत्रू असणं धोकादायक, पण मित्र असणं अजूनच घातक आहे. ते कोणत्या बाजूने जातील, याचा अंदाज नाही".
जॉन अब्राहमने त्याच्या चित्रपटाचा किस्सा सांगताना म्हणाला, "चित्रपटातील एक रोचक गोष्ट अशी होती की, इस्रायली कलाकारांनी इस्रायली पात्रं साकारली आणि इराणी कलाकारांनी इराणी पात्रं साकारली. पण आम्ही एकत्र बसून जेवलो आणि सगळं काही सुरळीत होतं. कोणतीही अडचण नव्हती. अशा गोष्टी पाहून वाटतं की जगात नक्की काय चाललंय आणि आपले मित्र सतत नियम बदलत असतात".
दरम्यान, 'तेहरान'पूर्वी जॉन हा 'द डिप्लोमॅट' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला समीक्षकांकडून आणि काही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर चालली नाही. तथापि, जेव्हा तो OTT वर प्रदर्शित झाला, तेव्हा लोकांनी त्याला खूप प्रेम दिलं आणि तो काही दिवस ट्रेंडिंगमध्येही होता. 'द डिप्लोमॅट' हा सत्य कथेवर आधारित होता आणि 'तेहरान'देखील सत्यकथेने प्रेरित आहे. १ तास ५० मिनिटांची थ्रिलर फिल्म एसीपी राजीव कुमार (जॉन अब्राहम) यांच्या साहसी मोहिमेवर आधारित आहे. हा चित्रपट इराण आणि इस्रायल सारख्या देशांभोवती फिरतो. चित्रपटात हिंदी तसेच पर्शियन आणि हिब्रू भाषेतील संवाद आहेत, जे कथेला आंतरराष्ट्रीय रंग देतात