John Abraham : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार, एमसीडी, एनडीएमसी, एनसीआरमधील प्रशासकीय यंत्रणांना शहरातील रस्ते आणि गल्लीबोळांना भटक्या कुत्र्यांच्या जाचापासून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्यात यावे आणि डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्यात यावे, तसेच या संस्थांनी पुढच्या सहा आठवड्यांमध्ये ५ हजार कुत्र्यांना पकडून सुरुवात करावी, असे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. यावर अभिनेता जॉन अब्राहमचे थेट सरन्यायाधीशांना भावनिक पत्र लिहलंय. अभिनेत्याने म्हटले आहे की कुत्रे 'भटके' नसून समाजाचा भाग आहेत, असं म्हटलंय.
जॉन अब्राहमने सरन्यायाधीशांना पत्र लिहून न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी सीजेआय बी.आर. गवई यांना पत्र लिहून त्यांनी हा निर्णय बदलण्याचे आवाहन केले. जॉनने म्हटले की, "मला आशा आहे की तुम्ही सहमत व्हाल की हे भटके कुत्रे नाहीत, तर सामुदायिक कुत्रे आहेत. ज्यांना अनेक लोक प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात आणि ते खरं तर हक्काने दिल्लीवासी आहेत. ते पिढ्यानपिढ्या माणसांचे शेजारी म्हणून येथे राहत आहेत".
पुढे तो म्हणाला, "एबीसी नियम कुत्र्यांना हटवून टाकण्याची परवानगी देत नाहीत, तर नसबंदी व लसीकरण करून त्यांना त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी परत सोडण्याची तरतूद आहे. जिथे एबीसी कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवला गेला, तिथे तो प्रभावी ठरला. दिल्ली देखील हे करू शकते. नसबंदी दरम्यान कुत्र्यांना रेबीजचा डोस दिला जातो आणि त्यानंतर कुत्रे शांत होतात, त्यांच्या आक्रमक वर्तनात आणि चावण्याच्या घटनांमध्ये घट होते. कुत्रे आपला परिसर ओळखतात, त्यामुळे ते नसबंदी व लसीकरण न केलेल्या कुत्र्यांना आपल्या क्षेत्रात येऊ देत नाहीत". दरम्यान, जॉनला 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स' (पेटा) इंडियाचे पहिले मानद संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. जॉनचं प्राण्यांवर विशेषतः कुत्र्यांवर विशेष प्रेम आहे.