Javed Akhtar: ज्येष्ठ पटकथाकार, लेखक-कवी जावेद अख्तर हे कायम राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेतात. यामुळे त्याला खूप ट्रोल केलं जातं. नुकतंच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या 'नरकतला स्वर्ग' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात (Sanjay Raut Book Narakatala Swarg Launch) सहभागी झाले होते. यावेळी जावेद अख्तर यांनी उपस्थितांसमोर आपल्यावर होणाऱ्या टीका आणि ट्रोलिंगबाबत परखडपणे मत मांडले. तसेच मुंबईबद्दलचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं.
जावेद अख्तर यांनी कार्यक्रमात लोकशाहीची खरी गरज काय आहे, यावर भाष्य केलं. ते म्हणाले, "लोकशाहीत प्रत्येक पक्षाची गरज असते, निवडणुकीची गरज असते. झालीच तर इमानदार मीडियाचीही गरज असते. तसेच लोकशाहीत असे नागरिक असावेत जे कोणत्याच पक्षाचे नसावे. त्यांना जे चांगलं वाटलं ते त्यांनी बोलावं. जे वाईट वाटतं ते बोलावं. मी त्यापैकीच एक आहे. त्यावरून मला सोशल मीडियावर भरपूर शिव्या पडतात. काही लोक म्हणतात तू काफीर आहे. नरकात जाशील. काही लोक म्हणतात तू जिहादी आहेस, तू पाकिस्तानात जा. जर नरक की पाकिस्तान ही चॉईस असेल तर मी नरकातच जायचं पसंत करेन", असं जावेद अख्तर यांनी म्हटलं.
पुढे ते म्हणाले, "जर एका बाजूनेच मला शिव्या मिळत असत्या, तर मला वाटले असते की मी चुकीचं काही बोलतोय. पण दोन्ही बाजूंनी लोक मला शिव्या देतात, याचा अर्थ मी काहीतरी बरोबर बोलतोय. यासोबतचं प्रशंसा करणारेही आहेत, पण शिवीगाळ करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे".
सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, जावेद अख्तर म्हणाले, "मी मुंबईत आलो. मी जे काही मिळवलं ते मुंबई आणि महाराष्ट्राने दिले. सात जन्मात मुंबईचे ऋण फेडू शकणार नाही. गेल्या ३० वर्षांत मला चार वेळा पोलीस संरक्षण मिळालं. चारपैकी तीन वेळा मुल्लांकडून धमकी आली", या शब्दात त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईबद्दलचं (Javed Akhtar On Mumbai) प्रेम व्यक्त केलं.