दिग्दर्शक नीरज घेयवान यांचा हिंदी भाषेतील चित्रपट 'होमबाउंड' यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात २१ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर प्रमुख भूमिकांमध्ये असून धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली करण जोहरने याची निर्मिती केली आहे.
'होमबाउंड' चित्रपटाचा कान्समधील प्रीमियर एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. 'होमबाउंड'ने टॉम क्रूझच्या चित्रपटालाही मागे टाकलं. 'होमबाउंड' सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ९ मिनिटे उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत कौतुक केलं. विशेष म्हणजे, याच महोत्सवात टॉम क्रूझच्या 'मिशन इम्पॉसिबल – फायनल रेकनिंग' हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांन फक्त ५ मिनिट उभं राहून टाळ्या वाजवल्या होत्या. त्यामुळे 'होमबाउंड'ला प्रेक्षकांची मिळालेली प्रतिक्रिया पाहून सिनेमाची संपुर्ण स्टारकास्ट भावुक झाल्याचं दिसलं.
धर्मा प्रॉडक्शन्सने सोशल मीडियावर या प्रीमियरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात संपूर्ण थिएटर टाळ्यांनी दुमदुमलेले दिसून येतंय. प्रेक्षकांच्या भरभरून मिळालेल्या प्रेमामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घेयवान आणि अभिनेता ईशान खट्टर अत्यंत भावूक झाले. त्यांनी आपल्या भावना रोखू न शकल्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. करण जोहरला मिठी मारल्यानंतर नीरज थेट रडू लागल्याचे दृश्य या व्हिडीओत दिसून आलं. 'होमबाउंड'ला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय प्रतिसादामुळे प्रेक्षक आता हा चित्रपट भारतीय थिएटरमध्ये पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.