Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर'चं वर्चस्व 'इक्कीस'ने मोडलं? तीन दिवसांत धर्मेंद्र यांच्या शेवटच्या सिनेमाने कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 10:36 IST

धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस'ची खूप चर्चा आहे. या सिनेमाने वीकेंडमध्ये चांगली कमाई केली आहे

नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या 'इक्कीस' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी सुरू ठेवली आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि नवोदित अभिनेता अगस्त्य नंदा यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर १५.१५ कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. विशेष म्हणजे, रणवीर सिंगच्या 'धुरंधर' या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर वर्चस्व असतानाही 'इक्कीस'ने आपला स्वतंत्र प्रेक्षकवर्ग टिकवून धरला आहे.

चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, गुरुवारी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने ७.२८ कोटी रुपयांची दमदार सुरुवात केली होती. शुक्रवारी कमाईमध्ये काहीशी घट होऊन हा आकडा ३.५० कोटींवर आला, मात्र शनिवारी पुन्हा एकदा प्रेक्षकांनी 'इक्कीस' बघायला गर्दी केली. तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने ४.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. जागतिक स्तरावर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता १८ ते १९ कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे.

श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले असून त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. तसेच, धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट असल्याने सिनेप्रेमींसाठी हा एक भावनिक अनुभव ठरत आहे. जयदीप अहलावत आणि सिमर भाटिया यांच्या सहाय्यक भूमिकांना देखील प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' आणि हॉलिवूडचा 'अवतार: फायर अँड ॲश' यांसारख्या मोठ्या चित्रपटांशी 'इक्कीस'ची थेट स्पर्धा आहे. 'धुरंधर'ने आधीच ७५० कोटींपेक्षा जास्त कमाई करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे, अशा परिस्थितीत 'इक्कीस'ने मिळवलेला १५ कोटींचा टप्पा समाधानकारक मानला जात आहे. रविवारच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला मिळेल आणि हा आकडा २० कोटींच्या जवळ जाईल, अशी दाट शक्यता वर्तवली  जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ' इक्कीस' breaks 'Dhurandhar' dominance? Dharmendra's last film earns crores in three days.

Web Summary : ‘ इक्कीस’, starring Dharmendra and Agastya Nanda, earned ₹15.15 crore in three days, holding its own against 'Dhurandhar'. The film honors Arun Khetarpal. It marks Nanda's debut and Dharmendra's final film, drawing emotional responses from audiences.
टॅग्स :धमेंद्ररणवीर सिंगअक्षय खन्नाधुरंधर सिनेमा