सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. कधी सेलिब्रिटींना रेस्टॉरंटमध्ये तर कधी जीमबाहेर स्पॉट करण्यात येतं. आता मात्र एका बॉलिवूड अभिनेत्याला चक्क कॉलेजमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. पण, हा अभिनेता कॉलेजमध्ये कोणत्या इव्हेंटसाठी नव्हे तर परिक्षा द्यायला गेला होता. प्रसिद्ध अभिनेत्याला कॉलेजमध्ये पाहून विद्यार्थीदेखील आश्चर्यचकित झाले.
व्हिडिओत दिसणारा हा अभिनेता म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हर्षवर्धन राणे आहे. हर्षवर्धन राणे सध्या सायकोलॉजिकल रिसर्चमध्ये शिक्षण घेत आहे. त्याची परिक्षा सुरू आहे. हर्षवर्धन परिक्षा देण्यासाठी कॉलेजमध्ये गेला. पण, चाहत्यांनी त्याच्याभोवती घोळका केला. याचा व्हिडिओ अभिनेत्याने शेअर केला आहे. कॉलेजमध्ये हर्षवर्धनला पाहून विद्यार्थ्यांनी त्याच्याभोवती सेल्फीसाठी गर्दी केल्याचं दिसत आहे. तर त्याला पाहून विद्यार्थी आश्चर्यचकित झाल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. "फक्त ३ तास झोपलो. आजचा पेपर लिहिला. सायकोलॉजिकल रिसर्चचा पेपर चांगला गेला. ८४-८६ टक्के आजच्या पेपरमध्ये मिळतील", असं कॅप्शन त्याने व्हिडिओला दिलं आहे.
हर्षवर्धन राणेने तेलुगु सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. 'सनम तेरी कसम' या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. हर्षवर्धनचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला तरीदेखील त्याला या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली. त्याने 'हसीना दिलरुबा', 'सावी', 'तारा वर्सेस बिलाल' अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही साऊथ सिनेमांमध्येही तो झळकला आहे