Join us  

'किरिक पार्टी'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार 'हा' अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 12:41 PM

'किरिक पार्टी' चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑक्टोबरमध्ये सुरूवात होणार आहे.

ठळक मुद्दे'किरिक पार्टी'च्या रिमेकसाठी सुरूवातीला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला विचारण्यात आले होते. 'किरिक पार्टी' या कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

'सोनू के टिटू की स्वीटी' चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. या सिनेमात सोनू शर्माची भूमिका साकारणारा अभिनेता कार्तिक आर्यनचे सगळीकडून खूप कौतूक झाले. त्यानंतर आता तो कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'किरिक पार्टी' हा कन्नड चित्रपट यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती आणि हा चित्रपट शंभर दिवसांहून अधिक काळ चित्रपटगृहात होता. कन्नडमध्ये जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारीत असून इंजिनिअरिंग महाविद्यालयात फर्स्ट इयरला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कथा रेखाटण्यात आली आहे. हे विद्यार्थी वेगवेगळ्या वर्गात शिकत असतात. मात्र ते हॉस्टेलमध्ये एकत्र राहतात. त्यामुळे त्यांचा ग्रुप बनतो आणि त्यांच्या शेवटच्या वर्षांपर्यंत ते काय धमालमस्ती करतात व एक मस्तीखोर मुलगा प्रेमात पडल्यानंतर समजूतदार कसा बनतो, हे यात दाखवण्यात आले आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन रिषभ शेट्टी यांनी केले आहे. 'किरिक पार्टी'च्या रिमेकसाठी सुरूवातीला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला विचारण्यात आले होते. मात्र आता कार्तिक आर्यनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते गुजराती दिग्दर्शक अभिषेक जैन करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती कायता प्रोडक्शनचे अजय कपूर, वृतिका लायकर व धीरज वाधवन करणार आहेत.या चित्रपटात कार्तिक सोबत नायिका कोण असणार हे अद्याप समजू शकलेले नाही. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ऑक्टोबरमध्ये सुरूवात होणार आहे. 'किरिक पार्टी'च्या रिमेकला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.

टॅग्स :कार्तिक आर्यन