Govinda Wife Sunita Ahuja: बॉलिवूड स्टार गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा कायम तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. सुनीता सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि तिनं स्वतःचं यूट्यूब चॅनल देखील सुरू केलं आहे. नुकतंच सुनीताने तिचा पहिला व्लॉग शेअर केला. त्या व्लॉगमध्ये ती चंदीगडमधील एका वाईन शॉपमधून दारूची बाटली खरेदी करताना दिसली. पण सुनीताने लगेचच स्पष्टीकरण देत सांगितले की ही बाटली तिच्यासाठी नसून दुसऱ्या एका खास कामासाठी आहे. तिचा हा व्लॉग सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.
व्लॉगमध्ये सुनीताने सांगितलं की, तिने चंदीगडमधील काही मंदिरांना भेट दिली. यात महाकाली मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ती कालभैरव बाबा मंदिरात गेली. तिथे प्रसाद म्हणून अर्पण करण्यासाठी तिने दारूची बाटली खरेदी केली. बाटली खरेदी करताना ती गंमतीने म्हणाली, "लोक मला दारुडी समजतील. पण हे माझ्यासाठी नाही, कालभैरव बाबांसाठी आहे". मंदिरात गेल्यावर तिने पुजाऱ्याला विचारले की, मंदिरात दारू का अर्पण केली जाते? त्यावर पुजारी म्हणाले की, "कालभैरव बाबा हे सर्व दुष्ट राक्षसांचा नाश करण्यासाठी दारू पितात".
याच व्हिडीओमध्ये सुनीताने गोविंदासोबतच्या तिच्या नात्याबद्दलही काही गोष्टी सांगितल्या. तिने सांगितले की, लहानपणी गोविंदाची पत्नी होण्यासाठी तिने महाकाली माता मंदिरात प्रार्थना केली होती. ती पुढे म्हणाली की, मीडिया त्यांच्या नात्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी पसरवत आहे आणि हे सर्व गैरसमज दूर करण्यासाठीच तिने स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे.