बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा पुन्हा एकदा त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आले आहेत. गोविंदाची पत्नी सुनिताने घटस्फोटासाठी अर्ज केल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर गोविंदाला कोर्टाकडून नोटीसही आल्याचं म्हटलं जात होतं. त्यांचा ३८ वर्षांचा संसार मोडणार असल्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत. यावर आता गोविंदाच्या मॅनेजरने प्रतिक्रिया देत नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.
गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हाने पीटीआयशी बोलताना घटस्फोटाच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. "६-७ महिन्यांपूर्वी जी बातमी आली होती ही तीच बातमी आहे. पण, आता सगळं काही ठीक आहे. येत्या एक-दोन आठवड्यात तुम्हाला सगळं काही कळेल. गोविंदाचं संपूर्ण कुटुंब एकत्र गणेशोत्सव साजरा करणार आहे. त्याच्या तयारीतच सध्या सुनिता बिझी आहेत", असं त्याने सांगितलं.
पण, यावर अद्याप गोविंदा किंवा सुनिता अहुजाने भाष्य केलेलं नाही. ६-७ महिन्यांपूर्वी सुनिताने गोविंदासोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला होता. पण, त्यानंतर त्यांच्यात सगळं काही सुरळीत झाल्याचं म्हटलं गेलं होतं. गोविंदाचं नाव एका मराठी अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं. त्यामुळे गोविंदा आणि सुनिताचा ३८ वर्षांचा संसार मोडणार असल्याचं बोललं जात होतं.