Join us

"प्रिय रितेश तू परफेक्ट..." 'फादर्स डे' निमित्त जिनिलीया देशमुखची खास पोस्ट, अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:56 IST

जिनिलिया देशमुखने 'फादर्स डे'ला रितेशसाठी खास पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.

जून महिन्याचा तिसरा रविवार दरवर्षी 'फादर्स डे' म्हणून साजरा केला जातो. वडिलांचं आपल्या आयुष्यात महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री जिनिलिया देशमुखनेही याच निमित्ताने तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुखसाठी एक खास आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे. २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीला रियान आणि राहील ही दोन मुलं आहेत.

जिनिलियाने आपल्या इन्स्टाग्रामवर रितेशचा मुलांसोबतचा फोटो पोस्ट केलाय. फोटोसोबत तिनं लिहलं, "प्रिय रितेश, तू तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट उत्तम करतोस. तुझं काम असो वा बाबा म्हणून जबाबदारी… सगळ्यात तू परफेक्ट आहेस. चांगला बाबा होण्याचे सगळेच रेकॉर्ड्स तू मोडले आहेत. नि:स्वार्थपणे प्रेम करणारा, मुलांबरोबर मस्ती करणारा – रियान आणि राहीलचा तू आहेस पर्सनल सुपरहिरो. 'द बेस्ट बाबा एव्हर" या शब्दात तिनं रितेशचं कौतुक केलं. 

रितेशने जिनिलिया हीच स्टोरी रीशेअर करत तिचे आभार मानले. त्यानं लिहिलं, "थँक्यू बायको! तुझ्यामुळे मी आपल्या मुलांचा चांगला बाबा बनू शकलो". याशिवाय, जिनिलियानं तिच्या वडिलांसाठीही पोस्ट शेअर केली आहे. तिनं वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला. त्यात लिहलं, "हॅपी फादर्स डे पॉप्स! 'जेव्हा परिस्थिती कठीण होते, तेव्हा खंबीर माणसंच पुढे जातात" हे तू नेहमी मला शिकवलं आहेस. आणि याच विचारसरणीमुळे मी आज जिथे आहे तिथपर्यंत पोहोचू शकले. माझं बळ बनल्याबद्दल तुझे खूप खूप आभार, पॉप्स! जेव्हा जेव्हा मला वाटतं की मी काही करू शकत नाही, तेव्हा तुझे शब्द आठवतात की "तू नक्की करू शकतेस" आणि मग मी धाडसाने पुढे जाते, असं म्हणत तिनं वडिलांवरचं प्रेम व्यक्त केलं. 

 वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर जिनिलिया ही लवकरच 'सितारे जमीन पर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर रितेश देशमुख अलिकडेच 'रेड २' आणि 'हाऊसफुल ५' मध्ये पाहायला मिळालाय.  

टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुखजागतिक पितृदिन