Join us

"तुम्ही कोण?" दिलीपने अर्जुन कपूरला ओळखलंच नाही, फराह खानने डोक्यावर मारला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 17:37 IST

फराह खानच्या नवीन व्लॉगमध्ये ती आणि तिचा कूक दिलीप दिसतात. त्यावेळी अर्जुन कपूरला दिलीपने ओळखलंच नाही, असं समजतंय

बॉलिवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका, निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खान आपल्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. ती अनेकदा तिच्या युट्यूब चॅनलवर व्लॉग्स शेअर करत असते. फराहच्या व्लॉगमध्ये तिचा कूक दिलीप असतो. शिवाय बॉलिवूडमधील सेलिब्रिटी फराहच्या व्लॉगमध्ये हजेरी लावत असतात. यावेळी रक्षाबंधननिमित्त फराहच्या व्लॉगमध्ये अर्जुन कपूर त्याची बहिण अंशुलासोबत सहभागी झाला होता. त्यावेळी दिलीपने अर्जुनला ओळखलंच नाही. काय घडला हा मजेशीर किस्सा, जाणून घ्या

दिलीपने अर्जुनला ओळखलंच नाही

फराह खानच्या नवीन व्लॉगमध्ये अभिनेता अर्जुन कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर फराहच्या घरी गेले होती. याच व्लॉगमध्ये फराहचा कुक दिलीपही होता. व्हिडिओमध्ये दिसते की अर्जुन थोडा उशिराने घरात येतो आणि सरळ दिलीपजवळ जाऊन त्याला मिठी मारतो. हसत-हसत तो म्हणतो, "सर, मी तुमचा फार मोठा फॅन आहे!" हे ऐकून फराहला मजा येते आणि  ती दिलीपला विचारते, “हा कोण आहे ते ओळखतोस का?” दिलीप काहीसा गोंधळलेला असतो. तो अर्जुन कपूरला ओळखत नाही. त्यामुळे अभिनेत्याच्या तोंडावरच “तुम्ही कोण?” असं तो विचारतो.

दिलीपच्या या निरागस उत्तराने तिथे उपस्थित सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू फुटतं. फराह लगेच अर्जुनची ओळख करून देत म्हणते, “हा एक कलाकार आहे.” मग अर्जुनला दिलीप ओळखतो. अर्जुनचा 'गुंडे' हा सिनेमा दिलीपने बघितला असल्याने त्याची ओळख पटते. यानंतर अर्जुन, अंशुला आणि दिलीप यांच्यात थोडा वेळ मोकळा संवाद होतो. गप्पागोष्टी, हशा आणि हलक्या-फुलक्या टोमण्यांमुळे वातावरण आनंदी होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच प्रेक्षकांनी दिलीपच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. अनेकांनी कमेंट करून त्याला “खरा स्टार” म्हटलं, तर काहींनी अर्जुनच्या साधेपणाचीही प्रशंसा केली.

टॅग्स :अर्जुन कपूरबॉलिवूडफराह खानयु ट्यूब