ज्या सिनेमासाठी चाहते आतुर होते त्या नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक अखेर काल समोर आली. गुरुवारी 'रामायण'चा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या अद्भुत वाटणाऱ्या टीझरने सगळ्यांनाच थक्क करून सोडलं. 'रामायण'च्या टीझरमध्ये शेवटी प्रभू श्री रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर आणि रावणाच्या भूमिकेतील यशची छोटीशी झलक पाहायला मिळाली. मात्र 'रामायण'चा टीझर आल्यानंतर रणबीरची तुलना राम चरणशी होऊ लागली आहे.
राम चरणने एसएस राजमौलींच्या RRR सिनेमात अल्लूरी सिताराम राजू ही भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये राम चरण प्रभू श्री रामांच्या रुपात दिसला होता. 'रामायण'च्या टीझरनंतर राम चरणचा RRRमधील हा लूक व्हायरल होत आहे. रणबीर कपूरपेक्षा राम चरणने प्रभू श्री रामांची भूमिका चांगली निभावली असती, असं काहींचं म्हणणं आहे.
मला वाटतं राम चरण प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी योग्य ठरला असता.
मी राम चरणचा चाहता नाही. पण, तरीही असं वाटतं की 'रामायण'मधील रामाच्या भूमिकेसाठी तो परफेक्ट होता.
सध्याच्या कलाकारांपैकी राम चरण हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी चपखल बसतो.
तर काहींनी राम चरणने RRRमध्ये रामाची भूमिका साकारली नव्हती. 'रामायण' सिनेमा मसाला नाही. त्यामुळे रणबीर कपूरच योग्य असल्याचं म्हटलं आहे.
'रामायण' सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता, यश रावण, सनी देओल हनुमान, रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. नितेश तिवारींचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा २०२६च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.