अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या भलत्याच कारणांमुळे चर्चेत आहे. त्याचा भाऊ फैजल खानने (Faisal Khan) आमिरवर बरेच आरोप केले आहेत. 'मेला' या सिनेमात आमिरसोबत त्याचा भाऊ फैजलही दिसला होता. नंतर फैजल गायबच झाला. तो मानसिक रुग्ण असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं. मधल्या काळात फैजलने आमिरवर आणि कुटुंबांवर काही आरोप केले होते. आता पु्न्हा त्याने पत्रकार परिषद घेऊन आमिर खानबाबतीत एक दावा केला आहे. आमिरला जेसिका हाइन्स या महिलेपासून एक मुलगा आहे असं तो म्हणाला. आता तर त्याने आमिर खानला थेट डीएनए टेस्टचं आव्हानच केलं आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत फैजल खान म्हणाला. "आमिरने जेव्हा रीनाशी लग्न केलं तेव्हाच तो जेसिका हाइन्ससोबत रिलेशनशिपमध्ये होता. सगळ्यांनाच हे माहित आहे. त्यांचा एक मुलगाही आहे. आमिरने कायम या गोष्टीचं खंडनच केलं आहे. तुम्ही डीएनए टेस्ट करु शकता. मी जे सांगतोय त्याचे माझ्याकडे पुरावेही आहेत. मी सगळं खरं बोलतोय. यातलं काहीच खोटं नाहीये."
आमिर खान आणि रीना दत्ताने १९८६ साली लग्न केलं. त्यांना आयरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे. २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आमिरच्या आयुष्यात ज्या अडचणी आल्या त्या फैजलने जवळून पाहिल्या आहेत. फैजल म्हणाला, "रीना आणि आमिरमध्ये खटके उडत होते तेव्हाही मी होतो. त्यांचा घटस्फोट झाला आणि मग तो आपल्या कामाला लागला. मी सुद्धा माझ्या कामात होतो. घटस्फोटाच्या वेळी आमिरने लगान या सिनेमातून आमिर खान प्रोडक्शन्स ही कंपनी सुरु केली. तो कामात बुडाला होता आणि रीनाही त्याला मदत करत होती. मी त्यांच्यात दुरावा येताना बघत होतो पण मला काहीच करता येत नव्हतं. तो त्यांचा निर्णय होता."