Join us

दिलजीत दोसांझ वादात, पाकिस्तानी अभिनेत्री हानियासोबत काम केल्यानं 'बॉर्डर २' हातून गेला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 11:54 IST

'सरदारजी 3' सिनेमामुळं दिलजीत दोसांझ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

 Diljit Dosanjh Sardaarji 3 Controversy: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) 'सरदार जी ३' सिनेमामुळे चर्चेत आहे.  यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरची (Hania Aamir) भूमिका आहे. त्यामुळे हा सिनेमा भारतात रिलीज झालेला नसून इतर देशांमध्ये बघायला मिळत आहे. पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतच्या सिनेमाला प्रमोट केल्याने दिलजीतवर दिलजीतवर टीकेची झोड उठली आहे. दिलजीतला ट्रोल करण्यासोबतच, त्याच्या चित्रपट, गाण्यांवर आणि इतर प्रकल्पांवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली. दरम्यान, FWICE ने 'बॉर्डर २' चित्रपटातून दिलजीतला काढून टाकण्याची मागणीही केली होती. अशातच आता त्याला  'बॉर्डर २' चित्रपटातून काढून टाकल्याचं बोललं जात आहे.

इंडिया टुडे/आज तकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलजीत दोसांझला दिग्दर्शक निधी दत्ताच्या 'बॉर्डर २' चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्माते आणि कलाकारांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. तथापि, चित्रपट निर्मात्यांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही. FWICE ने 'बॉर्डर २' च्या निर्मात्यांना मागणी केली होती की त्यांनी दिलजीत दोसांझसोबत काम करू नये. या चित्रपटात दिलजीत वरुण धवन, सनी देओल आणि अहान शेट्टीसोबत दिसणार होते.

दिलजीतला कोण रिप्लेस करणार?'बॉर्डर २'मधील ज्या दृश्यांमध्ये दिलजीत दोसांझ होता ते आता दुसऱ्या अभिनेत्यासोबत पुन्हा शूट केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'आज तक'च्या वृत्तावर विश्वास ठेवायचा झाला तर, दिलजीतची भूमिका आता अमनिंदरपाल सिंग विर्क साकारू शकतो. अमनिंदरपाल सिंग विर्कला Ammy Virk या नावाने ओळखलं जातं.

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आहे. दिलजीत आणि हानियाच्या 'सरदार जी ३'चं शूट त्याआधीच झालं होतं. मात्र भारत सरकारच्या निर्णयामुळे सिनेमा भारतात रिलीज होऊ शकला नाही. 

टॅग्स :दिलजीत दोसांझसीमारेषापाकिस्तान