आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा राज्य करत आहे. 'धुरंधर' सिनेमात पाकिस्तानातील गँगस्टर आणि तिथे जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेराची कहाणी दाखविण्यात आली आहे. रणवीर सिंग, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून सगळ्यांच्याच भूमिकांचं कौतुकही होत आहे. बॉलिवूडचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीदेखील 'धुरंधर'साठी भली मोठी पोस्ट लिहिली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन ट्वीट करत 'धुरंधर' आणि आदित्य धरचं कौतुक केलं आहे. या पोस्टमधून त्यांनी बॉलिवूडला टोला लगावला आहे. 'धुरंधर'बद्दल राम गोपाल वर्मा म्हणाले, "जेव्हा धुरंधरसारखा एखादा क्रांतिकारी आणि प्रचंड हिट ठरणारा चित्रपट येतो, तेव्हा इंडस्ट्रीतील लोक त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. याचं कारण म्हणजे आपण त्या दर्जाला पोहोचू शकत नाही अशी त्यांना भीती वाटत असते. ही असुरक्षितता त्यांच्यात असते. त्यामुळेच ते अशा सिनेमांना एक वाईट स्वप्न समजतात... जे आपण आपल्या स्वतःच्या चित्रपटांत जागे झाल्यावर आपोआप नाहीसे होईल, अशी त्यांची समजूत असते. सध्या विविध टप्प्यांत तयार होत असलेल्या तथाकथित ‘पॅन-इंडिया’ सिनेमांच्या बाबतीत हे जास्त खरं आहे. कारण हे सगळे चित्रपट धुरंधरआधी बनलेल्या चित्रपटांप्रमाणेच लिहिले आणि तयार केले गेले आहेत. जे की अगदीच धुरंधरच्याविरुद्ध आहेत. पण, त्यांना हे वाटलं होतं की हे सिनेमे चालतील. त्यात आणखी चिंतेची बाब म्हणजे धुरंधर हा केवळ एक ‘ओमेगा हिट’नसून गेल्या ५० वर्षांत सर्वाधिक चर्चा झालेला चित्रपट ठरला आहे".
"आपण कुणाच्या तरी घरी गेलो आणि तिथे एक मोठा, भयानक दिसणारा कुत्रा आपल्याकडे टक लावून पाहत आहे. मालक कितीही वेळा “तो काही करणार नाही, दुर्लक्ष करा” असं सांगत असला तरी मनातील ताण कमी होत नाही. उलट तो वाढतच जातो आणि आपण कानाडोळ्याने त्याच्याकडे पाहत राहतो, हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकालाच आला असेल. धुरंधरदेखील असा एक भयानक कुत्रा ठरेल. जो येणाऱ्या प्रत्येक बिग बजेट सिनेमांच्या निर्मिती कार्यालयात अदृश्यपणे फिरत राहील. ते लोक शक्य तितकं त्याचं नावही घेणं टाळतील, पण तो त्यांच्या मनात सतत घुटमळत राहील. धुरंधर हा त्या सर्व निर्मात्यांसाठी एक हॉरर सिनेमा आहे. ज्यांचा विश्वास VFX, महागडे सेट्स, आयटम साँग्स आणि हिरोगिरीवर आधारित असलेल्या जुन्या साच्यात बनलेल्या सिनेमांवर होता", असं त्यांनी म्हटलं आहे.
"धुरंधरमध्ये मात्र अभिनेत्यांऐवजी चित्रपटाचीच पूजा होत आहे. त्यामुळे हे सगळे लोक त्यांनी स्वतःच तयार केलेल्या मसाला चित्रपटांच्या अंधाऱ्या कोठडीत खिळले गेले आहेत. पण त्यांची कितीही इच्छा असली तरी हा कुत्रा जाणार नाही. त्यांचा पुढचा चित्रपट रिलीज झाला की तो चावायला तयारच असेल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आदित्य धरने इंडस्ट्रीतील लोकांना धुरंधरच्या तुलनेत सुंदर आणि प्रभावी दिसणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांना आरशात पाहायला भाग पाडलं आहे", असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
Web Summary : Ram Gopal Varma praises 'Dhurandhar', criticizing Bollywood's formulaic films. He calls it a game-changer, a 'scary dog' haunting big-budget productions, forcing filmmakers to re-evaluate their work.
Web Summary : राम गोपाल वर्मा ने 'धुरंधर' की प्रशंसा की, बॉलीवुड की घिसी-पिटी फिल्मों की आलोचना की। उन्होंने इसे एक गेम-चेंजर, एक 'डरावना कुत्ता' कहा जो बड़े बजट की प्रस्तुतियों को सता रहा है, फिल्म निर्माताओं को अपने काम का पुनर्मूल्यांकन करने के लिए मजबूर कर रहा है।