आदित्य धर दिग्दर्शित आगामी 'धुरंधर' (Dhurandhar) सिनेमाचं शूट सध्या जोरात सुरु आहे. सिनेमात रणवीर सिंह(Ranveer Singh), संजय दत्त (Sanjay Dutt), अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर माधवन अशी तगडी स्टारकास्ट आहे. मुंबई, नवी मुंबई अशा विविध भागात हे शूटिंग झालं असून आता टीम डोंबिवलीतही शूट करत आहे. डोंबिवलीतील माणकोली पुलावर शूटिंगचा थरार पाहताना अनेकांनी गर्दी केली. यावेळी सर्वांना संजू बाबाचीही झलक दिसली. संजय दत्तनेही सर्वांना हात दाखवला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमाची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. आदित्य धरसारख्या कमाल दिग्दर्शकासोबत इतकी तगडी स्टारकास्ट असणार म्हटल्यावर सिनेमा सुपरहिटच होणार अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता 'धुरंधर'ची टीम दोन दिवस डोंबिवलीत शूट करताना दिसली. शहरातील मोठा गाव माणकोली पुलावर याचं शूट सुरु होतं. शूटसाठी माणकोली पूल दोन दिवस बंदही ठेवण्यात आला आहे. पूलावर अनेक गाड्या दिसत आहेत आणि कलाकारांची फौज आहे. त्यातच एक कार पाण्यात पडतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुलावर कलाकारांमध्ये संजय दत्तही होता. त्याने सर्वांना हात दाखवला याचा व्हिडिओही चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आणखी एका व्हिडिओत 'धुरंधर'मधील रणवीर सिंहचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्याचा नवीन लूक समोर आला आहे. लांब दाढी, वाढलेले केस, जड कपडे अशा लूकमध्ये तो दिसत आहे. हा व्हिडिओ अमृतसरमधील आहे.
'धुरंधर'चे हे व्हायरल व्हिडिओ बघून चाहत्यांनी आताच सिनेमा 'ब्लॉकबस्टर' होणार असं जाहीरच केलं आहे. सिनेमा यावर्षीच्या अखेरीस किंवा पुढील वर्षीच्या सुरुवातीला रिलीज होण्याचा अंदाज आहे.