Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhurandhar 2 First Review: 'धुरंधर २' कसा आहे? सिनेमा पाहून राम गोपाल वर्मा म्हणाले "सिनेमॅटिक युगाची सुरुवात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:56 IST

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपला रिव्ह्यू शेअर केला आहे.

Dhurandhar 2 Review By Ram Gopal Varma : सध्या 'धुरंधर २'ची खूप चर्चा आहे. काहीच तासांमध्ये 'धुरंधर २' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  मात्र, चित्रपट अधिकृतपणे प्रदर्शित होण्यापूर्वीच सिनेसृष्टीतील 'किंग ऑफ रिअ‍ॅलिझम' म्हणून ओळखले जाणारे राम गोपाल वर्मा यांनी 'धुरंधर २'चा रिव्ह्यू दिला आहे.  राम गोपाल वर्मा यांनी 'धुरंधर २' या चित्रपटाला भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हटले आहे. 'धुरंधर २' समोर 'शोले' आणि 'मुघल-ए-आझम'ही फिके आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. 

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपला रिव्ह्यू शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, "बॉक्स ऑफिस कलेक्शनचे अंदाज, प्रेक्षकांमधील उत्सुकता, सामाजिक प्रभाव आणि ऑडिओ-व्हिज्युअल प्रभाव या सर्व बाबतीत बाबतीत 'धुरंधर २' हा 'शोले'पेक्षा १०० पटीने अधिक प्रभावी ठरेल.  इतकंच नव्हे, तर या चित्रपटाच्या तुलनेत 'मुघल-ए-आझम'पासून आजपर्यंतचे सर्व महान चित्रपट एखाद्या टीव्ही मालिकेसारखे वाटतील". 

राम गोपाल वर्मा यांच्या मते, हा चित्रपट म्हणजे एका नवीन सिनेमॅटिक युगाची सुरुवात आहे. ते पुढे म्हणाले, "हा एका नव्या सिनेमॅटिक युगाचा जन्म आहे आणि आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या सिनेमाच्या जगाच्या समाप्तीची सुरुवात आहे". आदित्य धरच्या दिग्दर्शनाचं कौतुक करताना ते म्हणाले की, आता 'डायरेक्टर' या शब्दाची सुरुवातच आदित्यच्या नावाने व्हायला हवी. राम गोपाल वर्मा यांनी विनोदाने स्टीव्हन स्पीलबर्ग आणि ख्रिस्तोफर नोलन यांनाही त्यांची सर्व कामं बाजूला ठेवून 'धुरंधर २'चा फर्स्ट डे-फर्स्ट शो पाहण्याचा सल्ला दिला आहे. 

विशेष म्हणजे, आदित्य धरनं अनेक वेळा सांगितले आहे की, राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटांनी त्याला प्रेरणा दिली आहे. विशेषतः 'सत्या' या चित्रपटाच्या शैलीतून बरेच काही शिकल्याचेही त्यानं मान्य केले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 'धुरंधर' पाहिल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी केलेली पोस्ट फिल्म विश्लेषणाच्या दृष्टीनेही खूप चर्चेत आली होती. आता 'धुरंधर २ ' पाहिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया पाहता, त्यांना हा सिनेमा प्रचंड आवडल्याचे स्पष्ट होतंय.

English
हिंदी सारांश
Web Title : Ram Gopal Varma hails 'Dhurandhar 2' as cinematic revolution.

Web Summary : Ram Gopal Varma praises 'Dhurandhar 2', calling it a cinematic masterpiece surpassing 'Sholay'. He anticipates massive box office success and impact, hailing it as the dawn of a new cinematic era. He suggests Spielberg and Nolan watch it immediately.
टॅग्स :धुरंधर सिनेमाराम गोपाल वर्मा