कंगणाने दीपिकाला पछाडले; ठरली सर्वांत महागडी अभिनेत्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 21:20 IST
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने आपल्या मानधनात दुप्पट वाढ केली असून ती बॉलिवूडमधील सर्वांत महागडी अभिनेत्री ठरली आहे. यापूर्वी ...
कंगणाने दीपिकाला पछाडले; ठरली सर्वांत महागडी अभिनेत्री!
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने आपल्या मानधनात दुप्पट वाढ केली असून ती बॉलिवूडमधील सर्वांत महागडी अभिनेत्री ठरली आहे. यापूर्वी बॉलिवूडमधील सर्वांधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोण हिचा उल्लेख केला जात होता. मागील वर्षी कंगनाने मानधनाचा मुद्दा उपस्थित केला होता. कंगनाने आगामी चित्रपटासाठी १५ कोटी रुपये मानधनाची मागणी केली असल्याचे सांगण्यात येते. बॉलिवूडमध्ये पुरु ष अभिनेत्यांची चलती आहे. त्यांचे मानधन अभिनेत्रींच्या तुलनेत कित्येक पट जास्त आहे. काही अभिनेते तर चित्रपटच्या नफ्यातील हिस्सा मानधन म्हणून स्वीकार करतात. मात्र, त्या तुलनेत अभिनेत्रींना मानधन फारच कमी मिळते. मागील वर्षी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पादुक ोणचा उल्लेख करण्यात येत होता. दीपिकाने ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या यशानंतर आपले मानधन १२ कोटी रुपये केले होते. ‘पद्मावती’साठी संजय लीला भन्साळी यांनी ही रक्कम देऊ केल्याचे सांगण्यात येते. दीपिकापूर्वी कंगनाने मानधनाचा मुद्दा उपस्थित केला होता. तिने एका चित्रपटासाठी ११ कोटी रुपयांची मागणी केली होती त्यावेळी अभिनेत्रींच्या मानधनाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. आता पुन्हा एकदा कंगना आपल्या मानधनामुळे चर्चेत आली आहे. आगामी चित्रपटासाठी कंगनाने १५ कोटी रुपये मानधनाची मागणी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंगनाने आपल्या मानधनात पन्नास टक्क्यांची वाढ केली आहे. कंगना सध्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ व हंसल मेहताच्या ‘सिमरन’ या चित्रपटात काम करीत आहे. हे दोन्ही चित्रपट स्त्रीप्रधान असून ज्यांनी याचे रफ शॉट्स पाहिले आहेत त्यांच्या मते, या दोन चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये कंगना नंबर वन ठरू शकते. कंगनाने आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले असून ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’ व ‘तनू वेड्स मनू रिर्टन्स’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप तिने पाडली आहे.