बॉलिवूडची मस्सकली गर्ल सोनम कपूर हिच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं थोडंचं आहे. आता हेच बघा ना, सोनमचा अभिनय, तिचा ग्लॅमरस अंदाज कायम आपल्याला भूरळ घालतो. तिचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात चाहते आहेत. त्यांच्यासोबत ती कायम संपर्कात असते. २०१८ मध्ये सोनम कपूरने आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्यामध्ये सोनमने घातलेल्या लेहंग्यापासून ते तिच्या अंगठीपर्यंत आणि तिच्या मंगळसूत्रापासून ते तिने सोशल मीडियावर नावात केलेल्या बदलापर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा रंगली होती. सोनमने सोशल मीडियावर तिचं नाव बदलून ‘सोनम कपूर आहुजा’ असं केलं आहे. मात्र तिने नाव बदलल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. विशेष म्हणजे नावातील हा बदल केवळ सोनमनेच केला नसून आनंदने देखील केला आहे. त्याने त्याच्या नावापुढे सोनमचं नाव जोडलं आहे. मात्र आनंदने हा बदल का केला हे नुकतंच सोनमने सांगितलं आहे.
‘एक महिला असल्यामुळे मला बॉलिवूडमध्ये कायम मला दुय्यम दर्जा देण्यात आला. मात्र महिला असल्यामुळे कोणत्याही स्त्रीने कधीच तडजोड करु नये. तिने तिच्या निर्णयावर कायम ठाम राहिलं पाहिजे. लग्नानंतर माझ्या पतीने आनंदने कायम मला पाठिंबा दिला. खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला. इतकंच नाही तर त्याने त्याच्या नावात बदल देखील केला. त्याच्या नावापुढे त्याने माझं नाव जोडत आनंद सोनम आहुजा असं केलं.’
पुढे ती म्हणते, ‘आनंद माझा चिअरलीडर आहे. माझ्याशी लग्न करुन त्याने मला नवीन ओळख दिली. इतक्यावरच न थांबता माझा आदर करत त्याने माझ्या नावाचा समावेशही स्वत:च्या नावात केला.’ आनंदने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर त्याचं नाव ‘आनंद एस. आहुजा’ असं केलं आहे.
दरम्यान, २०१८ मध्ये सोनम आणि आनंदने शीख परंपरेनुसार लग्नगाठ बांधली. सध्या ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. लग्नानंतर सोनम तिच्या करिअरकडे वळली असून ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात ती झळकली होती.