Join us  

विद्युत जामवालने केली film criticsची पोलखोल; सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यासाठी मागितली लाच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:10 AM

Vidyut jammwal: सिनेमाला चांगलं रेटिंग देण्यासाठी चित्रपट समिक्षकाने विद्युत जामवालकडे लाच मागितली. या गोष्टीचा विरोध करत विद्युतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut jammwal) सध्या त्याच्या 'क्रॅक-जीतेगा तो जिएगा' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. अॅक्शन थ्रिलर असलेल्या या सिनेमात त्याच्यासोबत अर्जुन रामपाल, नोरा फतेही आणि अॅमी जॅक्सन ही कलाकार मंडळी झळकली आहेत. विशेष म्हणजे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजत असून क्रिटिक्सही त्याला चांगला रिव्ह्यू देत आहेत. मात्र, एका चित्रपट समिक्षकाने चक्क विद्युतकडे लाच मागितली आहे. 'तुझ्या सिनेमाला चांगलं रेटिंग देतो', असं म्हणत त्याने लाच मागितली. या चित्रपट समिक्षकाचं हे सत्य विद्युतने समोर आणलं आहे. विद्युतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घडलेला प्रसंग सांगितला आहे.

विद्युतने एक्सवर (ट्विटर) एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये सुमित काडेल या चित्रपट समिक्षकाने विद्युतकडे लाच मागितली. विद्युतने या गोष्टीला विरोध केल्यानंतर त्याने विद्युतला ब्लॉक केलं आहे. त्यामुळेच विद्युतने त्याचं हे सत्य सर्वांसमोर आणलं आहे.

काय आहे विद्युतची पोस्ट?

"लाच देणं आणि लाच मागणं हा गुन्हा आहे.. माझा गुन्हा..लाच न देणं??? #सुमित काडेल", असं कॅप्शन देत विद्युतने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुमित काडेल याने विद्युतला ब्लॉक केल्याचंही दिसून येत आहे.

दरम्यान, विद्युतने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी सुमित काडेल याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तसंच त्याला क्रिटिक-पेड रिव्ह्युर, पेड क्रिटिक असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याच्यावर ताशेरे ओढले आहे. तसंच दुसरीकडे नेटकऱ्यांनी विद्युतचं कौतुक केलं आहे.

सुमितनेही केली पोस्ट

विद्युतने ही पोस्ट शेअर करण्यापूर्वी सुमितनेही एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात, ''जेव्हा लोकप्रियता डोक्यात जाते आणि तिची जागा अहंकाराने घेतली जाते त्यावेळी अधोगतीला सुरुवात होते. भाई-भतीजावादाच्या टॅगशिवाय खानदानी सेलिब्रिटी जास्त विनम्र आहेत. आज तथाकथित एका आऊट साईडरसोबत भेट झाली. ज्याचं वागणं अत्यंत वाईट होतं. त्यामुळेच इंडस्ट्रीतील टॉप कलाकार त्याच्यासोबत काम न करण्यासाठी कारणं शोधतात", असं सुमितने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्याची ही पोस्ट पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्याला, 'विद्युत जामवालविषय़ी बोलतो आहेस का?' असा सवालही विचारला. त्यावर, "मी एक गोष्ट क्लिअर करतो, ही रोस्ट कोणत्याही स्टार किंवा या जनरेशनच्या स्टार्ससाठी नाही ही पोस्ट अशा व्यक्तीसाठी आहे जो स्टार नाही पण स्वत:ला ब्रूस ली, जॅकी चॅन समजतो", असं उत्तर सुमितने दिलं होतं.

टॅग्स :विद्युत जामवालबॉलिवूडसिनेमाअर्जुन रामपालसेलिब्रिटी