Ginny Wedss Sunny 2: '१२ फेल' या चित्रपटातून अभिनेत्री मेधा शंकर (Medha Shankar) रातोरात स्टार झाली. आपल्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली. '१२ फेल' नंतर आता मेधा लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं नाव 'गिन्नी वेड्स सनी-२' असं आहे. अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आणि यामी गौतम यांची प्रमुख भूमिका असलेला 'गिन्नी वेड्स सनी' हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याचं दिग्दर्शन पुनीत खन्ना यांनी केलं होतं. त्यात आता निर्मात्यांनी या चित्रपटासंबंधित मोठी घोषणा केली आहे. जवळपास ५ वर्षानंतर 'गिन्नी वेड्स सनी' चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबतच चित्रपटातील स्टारकास्ट देखील फायनल करण्यात आली आहे.
'गिन्नी वेड्स सनी' या रोमकॉम चित्रपटाच्या पहिल्या भागात विक्रांत मेस्सी आणि यामी गौतमची जोडी पाहायला मिळाली. परंतु गिन्नी वेड्स सनी च्या सीक्वलमधून विक्रांत आणि यामीचा पत्ता कट करण्यात आला आहे. या सीक्वलमध्ये '१२ फेल' फेम अभिनेत्री मेधा शंकरची वर्णी लागली आहे. मेधा या चित्रपटात अभिनेता अविनाश तिवारीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, 'गिन्नी वेड्स सनी' दिग्दर्शनाची धुरा प्रशांत झा यांनी सांभाळली आहे. त्यासोबत चित्रपटाचं लेखन देखील त्यांनी केलं आहे. विनोद बच्चन यांच्या सौंदर्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे. या रोमकॉम चित्रपटाचं शूटिंग उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात आलं आहे. परंतु चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल कोणताही अपडेट देण्यात आलेली नाही.