Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून दररोज असंख्य तरुण-तरुणी स्वप्ननगरी मुंबईत येत असतात. काहींना यश मिळतं, तर काही अपयशी होऊन घरी परत जातात. ग्लॅमरच्या दुनिया जितकी आकर्षक दिसते तितकंच पडद्यामागचं वास्तव हे फार भीषण आहे. अशाच एका अभिनेत्रीचा शेवट अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या परिस्थितीत झाला. ही अभिनेत्री म्हणजे लैला खान. मृत्यूच्या ११ महिन्यानंतर या अभिनेत्रीचा मृतदेह विचित्र अवस्थेत सापडला होता.
अभिनेत्री लैला खान २००८ मध्ये आलेल्या 'वफा: अ डेडली लव्ह स्टोरी' या चित्रपटात राजेश खन्नासोबत दिसली होती. वफा या चित्रपटाचे दिग्दर्शन राखी सावंतच्या भावाने केले होते. या चित्रपटात राजेश खन्ना यांचे लैला खानसोबत अनेक इंटिमेट सीन्स होते, जे पाहून लोक थक्क झाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. या चित्रपटानंतर लैलाला चांगल्या चित्रपटांमध्ये काम मिळाले नाही. त्यामुळे तिने बी, सी ग्रेडच्या काही चित्रपटांमध्ये काम केलं.
लैलाने बांग्लादेशी असलेल्या मुनिर खान यांच्यासोबत लग्न केलं होतं. २०११ मध्ये अभिनेत्री इगतपुरी येथे फार्महाऊसवर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली. त्याचदरम्यान, तिची आई शेलिना पटेल आणि चार भावंडांसह बेपत्ता झाली. तिच्या बेपत्ता झाल्यानंतर तिचे वडील नादिर पटेल यांनी चौकशीसाठी पोलिसांशी संपर्क साधला.
व्हेकेशनला जाण्यापूर्वी तिने अनेक चित्रपट साइन केले होते आणि फी घेतली होती. अनेक निर्मातेही काळजीत होते. अनेकांना तर असं वाटू लागलं की ती पैसे घेऊन पळून गेली. मात्र, पोलीस तपासानंतर, लैला खानचा सांगाडा तिच्या कुटुंबासह सापडला. सावत्र वडिलांनीच संपूर्ण कुटुंबीयांची हत्या केल्याचं तपासात समोर आलं होतं. त्याने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लैलाच्या फार्महाऊसमधून ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले.