Kriti Sanon: बोलके डोळे आणि मोहक हास्याने अनेक सिनेरसिकांना क्लीनबोल्ड करणारी अभिनेत्री म्हणजे क्रिती सनॉन. आपल्या अभिनयाच्या जादूने तिने चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं. 'हिरोपंती' या सिनेमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. सध्याच्या घडीला ही अभिनेत्री बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका आहे. दरम्यान,क्रिती सनॉन तिच्या अभिनयासह बेधडक वक्तव्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या दिलेल्या एका मुलाखतीत क्रितीने हिंदी सिने इंडस्ट्रीत महिला कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल भाष्य केलं आहे.
आजही अनेक अभिनेत्री नायकांच्या तुलनेत कमी फी मिळाल्याने नाराजी व्यक्त करतात.याच मुद्यावर क्रिती सनॉनने मत मांडत नाराजी व्यक्त केली आहे. 'सीएनएन न्यूज 18'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्त्री-पुरुष कलाकारांच्या मानधनातील तफावतीबद्दल म्हणाली,"मला आजही समजत नाही की स्त्री आणि पुरुष कलाकारांच्या मानधनात समानता का नाही?कोणतीही खास भूमिका असो किंवा कोणतंही काम असो त्यांना मिळणारं मानधन सारखंच असलं पाहिजे. त्याने काहीच फरक पडणार नाही. चित्रपटांच्या बाबतीतही हाच नियम लागू करणं गरजेचं आहे. आम्ही कलाकार कायम याबद्दल बोलत असतो आणि ही गोष्ट आम्हाला देखील खटकते."
त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली,"जर एखाद्या चित्रपटात स्त्रीची प्रमुख भूमिका असेल तर तिला मिळणार मानधन हे एका पुरुष कलाकारांच्या मानधनापेक्षा कमी असतं. तेव्हा पैशांमुळे केला जाणारा भेदभाव जाणवतो. अशा चित्रपटांमधून त्यांना फारसे पैसे परत मिळणार नाहीत अशी भीती निर्मात्यांना आहे. हा एक गैरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे हिरो आणि हिरोईनला दिल्या जाणाऱ्या मानधनामध्ये भेदभाव केला जातो." असं मत अभिनेत्रीने मांडलं.
क्रिती सनॉनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ही अभिनेत्री आनंद एल राय दिग्दर्शित 'तेरे इश्क में'चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये ती साऊथ स्टार धनुषसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय कॉकटेल- २ मध्ये ही क्रिती सनॉन झळकण्याची शक्यता आहे.