Alia Bhatt :बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) ही इंडस्ट्रीतील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. एकापेक्षा एक चित्रपट व तिने साकारलेल्या भूमिका यामुळे आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. स्टुडंट ऑफ द इतर या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.'राझी','गली बॉय','कलंक','गंगुबाई काठियावाडी' तसेच 'आरआरआर ' या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. आलिया भट सध्या तिच्या मुलीच्या संगोपनात व्यस्त आहे.अशातच आता दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होते.
'ग्राझिया'या मॅगझीनसोबत संवाद साधताना आलिया भटने तिच्या मनातील खंत व्यक्त केली. शिवाय मुलाखतीदरम्यान तिने भविष्यात लेक राहासाठी कॉमेडी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी ती म्हणाली, "आतापर्यंत मी असा कोणताही चित्रपट केला नाही जो राहा पाहू शकेल. आई झाल्यानंतर मी कॉमेडी चित्रपटांकडे आकर्षित होत आहे. मी अशा गोष्टीच्या शोधात आहे जी मला कायम प्रेरणा देईल. असेच काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स माझ्याकडे आले आहेत.आता मी त्याबद्दल बोलू शकत नाही.मला फक्त योग्य दिशेनं पुढे जायचं आहे." असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं. दरम्यान, आलिया भटच्या या वक्तव्याने लवकरच ती एका कॉमेडी चित्रपटातून पाहायला मिळणार असल्याची हिंट दिली आहे. त्यामुळे तिचे चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत.
आलिया भटच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच ती 'जिगरा'या चित्रपटात पाहायला मिळाली होती. आता लवकरच आलिया तिच्या आगामी 'अल्फा'या बिग बजेट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शर्वरी वाघ देखील असणार आहे.