भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामन्याचा उत्साह शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचला. दोन्ही संघांचे चाहते सामन्याच्या निकालाकडे लक्ष ठेवून आहेत. अशावेळी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लंडनच्या लॉर्ड्सवर चाहत्यांची मोठी गर्दी जमली. यावेळी केवळ सामान्य चाहतेच नाही, तर बॉलिवूड स्टार अक्षय कुमारदेखील स्टँडमध्ये हजर राहून सामन्याचा आनंद घेताना दिसला. अक्षय कुमार एकटा नव्हता, तर त्याच्यासोबत एक बॉलिवूड अभिनेत्रीही होती. त्यांचा दोघांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. याशिवाय आणखीही एक वेगळी बॉलिवूड अभिनेत्री लॉर्ड्सवर सामना पाहायला पोहचल्याचे दिसले.
अक्षय कुमारसोबत कोणती अभिनेत्री?
सोमवारी लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस होता. टीम इंडिया १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होती आणि शेवटच्या दिवशी त्यांना १३५ धावांची आवश्यकता होती, तर त्यांच्याकडे ६ विकेट शिल्लक होत्या. अशा परिस्थितीत, शेवटच्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. त्यात अक्षय कुमारचा फोटो टीव्ही स्क्रीनवर दिसला. अक्षय कुमार माजी कोच रवी शास्त्री यांच्यासोबत बसला होता. अक्षयच्या शेजारी एक बॉलिवूड अभिनेत्रीही बसलेली दिसली. हा फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही अभिनेत्री होती अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना. ती देखील त्याच्यासोबत सामना पाहायला आली होती. त्यांचा फोटो व्हायरल झाला.
आणखी एक बॉलिवूड अभिनेत्रीचीही हजेरी
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्याशिवाय लॉर्ड्सच्या स्टेडियममध्ये आणखी एक बॉलिवूड अभिनेत्रीही सामन्याचा आनंद लुटताना दिसली. ती अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनॉन. क्रिती आपल्या मित्रमंडळींसोबत लॉर्ड्सच्या स्टेडियममध्ये मॅच एन्जॉय करताना दिसली. तिचेही फोटो चांगलेच व्हायरल झाले.
दरम्यान, कालच लंडनमध्ये विम्बल्डन फायनलचा सामना झाला. तेथे अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले होते. तेथूनच काही स्टार्स आज कसोटी सामन्याचा अंतिम दिवस एन्जॉय करण्यासाठी लॉर्ड्सवर आले.