Param Sundari Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांचा बहुप्रतिक्षित परमसुंदरी चित्रपट अखेर २९ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री सिनेरसिकांच्या पसंतीस उतरली आहे. शिवाय या सिनेमात दक्षिण भारत आणि उत्तर भारताच्या संस्कृतीच उत्तम दर्शन घडवण्यात आलं आहे. प्रेमकथेवर आधारित असलेला हा चित्रपट आजच्या काळातील प्रेमी यूगुलांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतो आहे.प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगली चर्चा सुरु आहे. त्यात आता या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे.
'परमसुंदरी' हा एक हलका-फुलका, रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपट समीक्षक देखील या चित्रपटाचं भरभरुन कौतुक करत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी तिकिटबारीवर किती गल्ला जमवला जाणून घेऊया... सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दुसर्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही परम सुंदरी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे चित्रपटाची दोन दिवसांची कमाई १६.२५ कोटी इतकी झाली आहे. आता आगामी काळात हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, 'परमसुंदरी' हा चित्रपट सिद्धार्थच्या कारकिर्दीतील पाचवा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. 'परम सुंदरी' या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केलं आहे. तुषार जलोटा यांनी यापूर्वी अभिषेक बच्चन अभिनीत 'दसवी' चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.