Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या मुंबईतील (Mumbai) राहत्या घरी घुसून (१६ जानेवारी) एका चोरट्याने हल्ला केला होता. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता सैफ अली खान घरी परतला आहे. पाच दिवसानंतर अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सैफ सुखरुप घरी परतल्यामुळे खान कुटुंबीयांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. तो घरी आल्यानंतर अभिनेत्यांचं छान स्वागत करण्यात आलं आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर सैफ अली खानच्या वांद्रे पश्चिम येथील घराचा व्हिडीओ समोर आला आहे. 'इन्स्टंट बॉलिवूड' या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सैफच्या स्वागतासाठी घरच्या मंडळींना संपूर्ण अपार्टमेंटला आकर्षक रोषणाई केलेली पाहायला मिळते आहे. त्याच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर सैफ अली खानच्या घराचे हे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. सैफ घरी आल्यामुळे आता त्याचे चाहते देखील प्रचंड खुश आहेत.
गेल्या आठवड्यात एका चोरट्याने मध्यरात्री त्याच्या घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला होता. त्यामध्ये गंभीर झालेल्या खान याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया केल्या होत्या. डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देऊन नियमित तपासणीसाठी आठवड्याने येण्याचा सल्ला दिला आहे.