Police Station Mein Bhoot: आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) .'सत्या'पासून ते अगदी 'फॅमिली मॅन' पर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. राम गोपाल वर्मा यांचा 'सत्या' चित्रपट त्यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. राम गोपाल वर्मा यांच्या या चित्रपटात त्यांनी साकारलेला भिकू म्हात्रे आजही तितकाच लोकप्रिय आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २७ वर्षांचा काळ उलटला आहे, तरीही चित्रपटाची क्रेझ कायम आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज वाजपेयी राम गोपाल वर्मा यांच्या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे.
मनोज वाजपेयी राम गोपाल वर्मा यांच्या आगामी पुलिस स्टेशन में भूत चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट असणार आहे. या प्रोजेक्टमध्ये जेनेलिया डिसूझा देखील आहे. या फ्रेश जोडीला आता स्क्रिनवर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत. अशातच सोशल मीडियावर 'पुलिस स्टेशन में भूत' सिनेमाच्या मोशन पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या पोस्टरमध्ये मनोज वाजपेयी एका पोलिस अधिकाऱ्याच्या लूकमध्ये दिसत आहेत तर त्यांच्या हातात रक्ताने माखलेली बाहुली आहे.हे पोस्टर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तसेच बॅकग्राउंडला विचित्र असा आवाज येतो आहे.
दरम्यान, आपल्या सोशल मिडिया अकाउंटर 'पुलिस स्टेशन में भूत' सिनेमाचं पोस्टर शेअर करत मनोज वाजपेयींनी लिहिलंय, "#PoliceStationMeinBhoot चे शूटिंग सुरुवात, सत्या पासून आतापर्यंत... एखादा प्रवास पूर्ण होण्यासाठी विशिष्ट गोष्टींची गरज असते. तेव्हा ते वर्तूळ पूर्ण होतं. आमचा नवा हॉरर कॉमेडी 'भूत इन पोलिस स्टेशन' बऱ्याच कालावधीनंतर @rgvzoomin सोबत पुन्हा एकत्र येताना खूप आनंद झाला." अशा भावना त्यांनी या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत.
मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, अशी माहिती मिळते आहे.