Join us  

Birthday Special : नीना गुप्तांच्या ‘त्या’ निर्णयाने माजली होती खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 11:46 PM

नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा चित्रपटांत नीना गुप्तांनी काम केले. पण त्यांची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या एका ‘बोल्ड’ निर्णयाने.

नीना गुप्ता या नावाला कुठल्याही विशेषणाची गरज नाही. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री यापलीकडे एक प्रतिभावान दिग्दर्शक आणि निर्माती अशी त्यांची ओळख आहे. आपल्या प्रगल्भ अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्तांचा आज (4 जुलै) वाढदिवस. 4जुलै 1959 रोजी जन्मलेल्या नीना यांनी सनावर लॉरेन्स स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. पुढे संस्कृत या विषयात पदवी घेतली.

‘खानदान’ या टीव्ही मालिकेद्वारे नीना गुप्तांनी आपले फिल्मी करिअर सुरू केले. यानंतर नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा चित्रपटांत त्यांनी काम केले. पण त्यांची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या एका ‘बोल्ड’ निर्णयाने. 8० च्या दशकात त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची प्रचंड चर्चा झाली. यासाठी त्यांना पराकोटीच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण स्वतंत्र विचारांच्या नीना जगाची पर्वा न करता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हा निर्णय होता, वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा. 8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता.

असे म्हणतात की, वेस्ट इंडिजची टीम भारतात खेळायला आली. त्याचदरम्यान विवियन आणि नीना एकमेकांना भेटले आणि या पहिल्या भेटीतचं ते एकमेकांच्या प्रेमात पडले. खरे तर विवियन त्यावेळी विवाहित होता. पण ना नीना यांपी त्याची पर्वा केली, ना विवियनने. दोघांचीही संस्कृती, आचार-विचार, आयुष्य सगळे काही भिन्न होते. पण असे असूनही दोघांचे प्रेम बहरले. इतके की, केवळ भारतातचं नाही तर इंटरनॅशनल मीडियातही या प्रेमप्रकरणाची चर्चा झाली.विवियन नीनाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. पण त्याला आपले लग्नही तोडायचे नव्हते. त्यामुळे त्याने नीनासोबत लग्न करण्याचा विचार बाजूला केला. पण प्रेमाचे पाश तोडणे मात्र त्याला जमले नाही. याच प्रेमाचे प्रतिक म्हणजे, नीना व विवियन यांची मुलगी मसाबा.

विवियनपासून नीना प्रेग्नट राहिल्या. लग्न न करता प्रेग्नंट राहिलेल्या नीना यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने भारतात जणू खळबळ उडाली. त्याकाळात कुणीच त्यांची सोबत दिली नाही. सुरूवातीला त्यांच्या स्वत:च्या कुटुंबानेही त्यांना जवळ केले नाही. नीना प्रेग्नंट असताना त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर मात्र नीनाच्या वडिलांनी मुलीला आधार दिला. ते दिल्लीहून मुंबईला मुलीसोबत राहायला आलेत.1989 मध्ये नीना यांनी मुलीला जन्म दिला. कुमारी माता बनण्याच्या नीनांच्या या निर्णयावर त्यावेळी प्रचंड टीका झाली. पण नीना डगमगल्या नाहीत. नीनाने सिंगल पॅरेंट बनून मसाबाचे संगोपन केले. कारण मसाबाच्या जन्मानंतर विवियन व नीना यांच्या आयुष्यात बराच बदल झाला. हळूहळू दोघांच्या भेटी कमी झाल्यात. त्यांच्यात दुरावा आला. पुढे दोघांनीही एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. अर्थात विवियनने नीनांसोबत संबंध तोडले तरी पित्याचे कर्तव्य मात्र निभवले.विवियनकडून एकार्थाने धोका मिळाल्यानंतर नीना यांनी एकटीच्या बळावर मसाबाला घडवले. आज मसाबा बॉलिवूडची नामवंत फॅशन डिझाईनर म्हणून ओळखली जाते.

मसाबाच्या जन्मानंतर 19 वर्षांनी म्हणजे 2008 मध्ये नीना यांनी दिल्लीचे चार्टर्ड अकाऊंटंट विवेक मेहरा यांच्यासोबत लग्न केले.

टॅग्स :नीना गुप्ताबॉलिवूडटेलिव्हिजन