Join us

'41 वर्ष, प्रत्येक रविवारी...' बिग बी अमिताभ बच्चन यांनी शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 19:48 IST

बिग बींनी सोमवारी ट्विटरवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला.

बिग बी अमिताभ बच्चन दर रविवारी आपल्या चाहत्यांना भेटतात. हेच कारण आहे की, अमिताभ यांची एक झलक पाहायला मिळावी, म्हणून दर रविवारी हजारो चाहते ‘जलसा’ समोर ताटकळत उभे असतात. गत रविवारी (२४ स्पटेंबर) सुद्धा यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. हजारो चाहत्यांनी अमिताभ यांना भेटण्यासाठी ‘जलसा’ बाहेर गर्दी केली होती आणि याचदरम्यान ‘जलसा’चे दरवाजे उघडले अन् पांढरा सदरा आणि त्यावर पांढरी शाल अशा रूबाबदार पोशाखात अमिताभ चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर आले. 

प्रत्येक रविवारी चाहते जलसासमोर येतात आणि अमिताभ बच्चन त्यांना भेटतात, या गोष्टीला आता 41 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावर बिग बींनी सोमवारी ट्विटरवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला. बिग बींनी लिहिलं की, "हा रविवार .. 41 वर्षे! प्रत्येक रविवारी मिळणाऱ्या चाहत्यांच्या या प्रेमासाठी माझ्याकडे शब्द नाहीत". त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते जलसाच्या बाहेर थांबलेल्या चाहत्यांना अभिवादन करताना आणि ऑटोग्राफ देताना दिसले. 

अमिताभ यांची रविवारी मुंबईतील त्यांच्या घरी जलसासमोर चाहत्यांना भेटण्याची परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे. 1982 पासून प्रत्येक रविवारी अमिताभ बच्चन त्यांच्या निवासस्थानाबाहेर दिसतात आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी दूर-दूरवरून प्रवास करुन येणाऱ्या चाहत्यांना भेटतात.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ते आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि प्रभास देखील मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अमिताभ टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांच्या 'गणपत' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी