IndiavsPakistan: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागू झाला असला तरी अजून तणाव निवळलेला नाही. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये वादळ उठले आहे. पाकिस्तानी कलाकारांवर भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तर अनेक पाकिस्तानी नागरिक सोशल मीडियावर भारतीय कलाकारांना सोशल मीडियावर अनफॉलो करत आहेत. या यादीत आता लोकप्रिय युट्यूबर आणि अभिनेता भुवन बामचंही नाव समाविष्ट झालं आहे. मात्र, भुवनने पाकिस्तानी नागरिकाला दिलेलं उत्तर (Bhuvan Bam's Befitting Reply To Pakistani) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
एका पाकिस्तानी फॉलोअरने भुवन बामला इंस्टाग्रामवर मेसेज करत लिहिलं, "सॉरी भुवन भैया, अनफॉलो"य या युजरच्या प्रोफाइलवर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज होता. यावर भुवन बामने अतिशय ठामपणे उत्तर देत लिहिलं, "भाऊ, जर तुम्हाला तुमच्या देशासोबत उभे राहिल्याने कमी फॉलोअर्स मिळत असतील, तर काहीच हरकत नाही".
भुवनचं हे उत्तर सोशल मीडियावर काही क्षणांतच व्हायरल झालं. भारतीय युजर्सनी भुवन बामच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. अनेकांनी भुवनला 'डिजिटल देशभक्त' ठरवलं आहे. काही युजर्सनी लिहिलं, "फक्त एकच हृदय आहे भुवन, तू किती वेळा जिंकशील?" अशा प्रतिक्रियांमुळे भुवन बाम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
भुवन बामने आपल्या कारकिर्दीची सुरुवात युट्यूबवरून केली होती. 'बीबी की वाईन्स'मधून आपल्या विनोदी व्हिडीओंनी लोकप्रियता मिळवणाऱ्या भुवनने 'धिंडोरा' आणि 'ताजा खबर' या वेब सिरीजमधून अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली. याशिवाय त्याचा टॉक शोही लोकप्रिय ठरला असून, त्यामध्ये शाहरुख खान, एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांसारख्या बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.
भुवन बामचा हा स्पष्टवक्तेपणा आणि देशभक्तीची भावना यामुळे त्याचे फॉलोअर्स अधिक घट्टपणे जोडले गेले आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या डिजिटल युद्धात भुवनने आपली बाजू ठामपणे मांडत अनेकांची मनं जिंकली आहेत.