Join us  

या कारणामुळे अलका याज्ञिक सध्या बॉलिवूडमध्ये खूपच कमी गाणी गाते...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 6:30 AM

सध्या बॉलिवूडमध्ये अलका याज्ञिक खूप कमी गाणी का गात आहे याविषयी ती सुपरस्टार सिंगरमध्ये सांगणार आहे.

ठळक मुद्दे बॉलिवूडमध्ये अलका कमी गाणी गात असल्याचे कारण तिला कमी संधी मिळताहेत हे नसून तिच्या प्रायोरिटिज बदलल्या आहेत. सध्या आपल्या आईसोबत वेळ घालवणे ही तिची प्राथमिकता असल्याचे तिने या कार्यक्रमात कबूल केले. 

आई ही प्रत्येकाच्या जीवनाला बळ आणि आधार देणारी सर्वात मोठी शक्ती असते. आईचे आपल्या मुलावरील निरपेक्ष प्रेम आणि ती आपल्या मुलाला जो आधार देते त्याचा गौरव करण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगरचा या आठवड्यातील भाग आईला समर्पित केला जाणार आहे.

या आठवड्याचा भाग अत्यंत मनोरंजक आणि भावनाप्रधान असणार आहे. स्पर्धक मुले आपली गाणी आईला समर्पित करतील आणि आपल्या आईशी असलेल्या खास नात्याविषयी सांगतील तर परीक्षक जावेद अली आणि हिमेश रेशमिया यांच्या सोबत देखील त्यांची आई या कार्यक्रमात उपस्थित राहाणार आहे. तसेच या कार्यक्रमातील स्पर्धक स्नेहा शंकरचे गाणे ऐकून अलका याज्ञिक न राहवून आपल्या आईविषयी काही खास गोष्टी सांगणार आहे. 

मुंबईच्या 13 वर्षीय स्नेहा शंकरच्या परफॉर्मन्सने सर्वांचे डोळे पाणावणार असून स्नेहा आणि तिच्या आईतील भावबंध पाहून आपल्या आईची आठवण आली, असे अलका याज्ञिक सांगणार आहे. तसेच ती सध्या बॉलिवूडमध्ये खूप कमी गाणी का गात आहे याविषयी देखील सांगणार आहे. बॉलिवूडमध्ये अलका कमी गाणी गात असल्याचे कारण तिला कमी संधी मिळताहेत हे नसून तिच्या प्रायोरिटिज बदलल्या आहेत. सध्या आपल्या आईसोबत वेळ घालवणे ही तिची प्राथमिकता असल्याचे तिने या कार्यक्रमात कबूल केले. 

अलका याज्ञिक सांगते, लहानपणापासूनच आईशी माझे घट्ट नाते आहे. ती माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे. मी माझी सगळी गुपिते तिला सांगत आले आहे. माझ्या आणि माझ्या आईच्या नात्याचे प्रतिबिंब मला स्नेहा आणि तिच्या आईच्या नात्यात दिसले. गेल्या काही वर्षांपासून माझ्या आईची प्रकृती ठीक राहात नसल्याने मी तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवते आणि याचमुळे मी निवडक कामच घेते आहे. माझ्याकडे चालून येणारे प्रत्येक काम मी घेत नाही.”

प्रेक्षकांना सुपरस्टार सिंगरचा हा खास भाग शनिवार आणि रविवार रात्री आठ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :अलका याज्ञिक