बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट ही तशी पापाराझींची लाडकी अभिनेत्री. आलिया मीडिया आणि पापाराझींशी चांगला संवाद साधताना दिसते. पण अलीकडेच एका व्हिडिओमुळे आलिया भट चर्चेत आली आहे. मुंबईत ती पिकलबॉल खेळायला जाण्यासाठी बाहेर पडली असताना काही पापाराझी तिच्या सोसायटीच्या गेटमध्ये आत आले आणि फोटो काढू लागले. हे पाहून आलिया भडकली. पुढे काय घडलं? जाणून घ्या.
आलियाचा राग अनावर, काय घडलं?
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आलिया कारमधून खाली उतरते. अशातच तिचे फोटो आणि व्हिडीओ टिपण्यासाठी पापाराझी तिच्या मागोमाग धावत तिच्या बिल्डिंगच्या आत घुसतात. हे पाहून आलियाचा राग अनावर होतो. तिने थेट त्यांना सांगितले – “गेटच्या आत येऊ नका, ही तुमची बिल्डिंग नाही. बाहेर जा.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी आलियाच्या या प्रतिक्रियेचं समर्थन केलं आहे. चाहत्यांनी म्हटलं की, सेलिब्रिटी असले तरी त्यांनाही खाजगी आयुष्य आणि वैयक्तिक जागा मिळायला हवी.
आलियाचा हा पहिला अनुभव नाही. याआधीही २०२३ मध्ये तिच्या घराबाहेर कॅमेऱ्याने खिडकीतून फोटो काढल्याच्या घटनेवर तिने सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा तिने सोशल मीडियावर पोस्ट करून आपली प्रायव्हसी भंग झाल्याचं सांगितलं होतं. अशातच काही दिवसांपूर्वी सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याने खान आणि कपूर कुटुंब स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहेत. सध्या आलिया भट YRFच्या ‘स्पाय युनिव्हर्स’मधील 'अल्फा' या चित्रपटात आणि संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये प्रमुख भूमिकेत काम करत आहे.