Join us  

"हिंदूंच्या भावना दुखावल्या तर...", नेटकऱ्याने अक्षयला दिली तंबी, 'OMG 2'चा 'तो' Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 3:52 PM

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'ओएमजी २' (OMG 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला ट्रोल केलं आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख मिळवलेला अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) त्याच्या आगामी 'ओएमजी २' (OMG 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'ओएमजी' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. 'ओएमजी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता. त्यामुळे 'ओएमजी २' चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

'ओएमजी' चित्रपटातील अक्षय कुमारचा लूक काही दिवसांपूर्वी समोर आला होता. महादेवाच्या अवतारातील अक्षय कुमारच्या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. नुकतंच अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधील अक्षयचा जटाधारी महादेवाचा लूक पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना खिलाडी कुमारचा हा लूक आवडला आहे. तर काहींनी कमेंट करत अक्षयला थेट तंबी दिली आहे. 

एका नेटकऱ्याने अक्षयच्या या व्हिडिओवर कमेंट करत "हा चित्रपट हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणार नाही, अशी अपेक्षा आहे, " असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "यावेळी तरी सनातन आणि देवतांची खिल्ली उडवू नका...समजलं का?", अशी कमेंट केली आहे. "'ओएमजी' तर हिंदू धर्माच्या विरुद्ध होता. हा चित्रपट चांगला असेल अशी अपेक्षा करतो," असंही एकाने म्हटलं आहे. "मी मुस्लीम आहे, पण ओएमजी २ हा चित्रपट", असं म्हणत एका नेटकऱ्याने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. "देवाच्या नावावर यावेळी काहीही उलट सुलट दाखवून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या तर बॉलिवूडकरांची खैर नाही," असा इशारा नेटकऱ्याने कमेंटमधून दिला आहे. 

'ओएमजी २' या चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. ११ ऑगस्टला हा चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडसिनेमापंकज त्रिपाठीयामी गौतम