Join us  

अक्षय कतरिनाच्या 'या' सिनेमात तब्बल 84 लाख लीटर पाणी वाया, '15 मिनिटांच्या सीनसाठी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 9:40 AM

या एका सिनेमात निर्मात्यांनी पैसे नाही तर लाखो लीटर पाणी वाया घालवले होते. 

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे काही ना काही संदेश देऊन जातात. समाजात जागृती निर्माण करणारे हे संदेश असतात. 'टॉयलेट एक प्रेम कथा', 'पॅडमॅन', 'स्वदेस' ही अशीच काही उदाहरणं. सिनेमा बनवण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसा खर्च केला जातो. तसंच सिनेमातील सीन शूट करताना सगळं काही खरं वाटावं म्हणून बरीच मेहनतही घेतली जाते. अक्षय कुमार (Akshay Kumar), कतरिना कैफच्या (Katrina Kaif) या एका सिनेमात निर्मात्यांनी पैसे नाही तर लाखो लीटर पाणी वाया घालवले होते. 

84 लाख लीटर पाणी वाया घालवलं

होय. अक्षय कुमार, कतरिना कैफ, परेश रावल, सुनील शेट्टी, समीरा रेड्डी, शक्ती कपूर, जॉनी लिवर, चंकी पांडे अशी भलीमोठी स्टारकास्ट असलेल्या सिनेमाचा क्लायमॅक्स सीन शूट करताना लाखो लीटर पाणी वाया गेले होते.  2009 साली आलेला तो सिनेमा होता 'दे दना दन'. या सिनेमाचा क्लायमॅक्स एका हॉटेलमध्ये शूट करण्यात आला. पूर्ण हॉटेलमध्ये पूरासारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी 100 किंवा 200 नाही तर ७०० पाण्याचे टँकर्स आणण्यात आले होते. केवळ क्लायमॅक्स सीनसाठी तब्बल 84 लाख लीटर पाण्याची नासाडी केली गेली होती. एवढ्या पाण्यात तर एखाद्या गावाची तहान भागू शकते. 

संशोधनानुसार एका व्यक्तीला दररोज सुमारे ४ ते ५ लीटर पाण्याची आवश्यकता असते. ४ लीटरच्या हिशोबाने 84 लाख लीटर पाण्याने तब्बल 21 लाख लोकांची तहान भागू शकते. १५ मिनिटांच्या सीनसाठी भरघोस पाणी वाया गेल्याने अनेकांनी सिनेमावर टीकाही केली होती.

टॅग्स :अक्षय कुमारकतरिना कैफपाणीसिनेमा