मोहित सूरीच्या रोमँटिक चित्रपट 'सैयारा'मधून अहान पांडेने पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अनीत पड्डा झळकली होती आणि दोघांनी रुपेरी पडद्यावर कमाल केली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना दोघांची केमिस्ट्री खूप आवडली आणि पाहता पाहता दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. गेल्या काही दिवसांपासून अनेकांनी दावा केला होता की, 'सैयारा'चे कृष कपूर म्हणजेच अहान आणि वाणी बत्रा उर्फ अनीत एकमेकांना डेट करत आहेत. पण आता अहान पांडेने अनीत पड्डासोबतच्या त्याच्या नात्यावर मौन सोडले आहे.
नुकतीच अहान पांडेने GQ ला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा अनेक गोष्टी शेअर केल्या. या खास मुलाखतीत 'सैयारा' स्टारने अनीत पड्डासोबतच्या त्याच्या केमिस्ट्री आणि रिलेशनशीपबद्दलही मोकळेपणाने चर्चा केली. अभिनेत्याने सांगितले की, "अनीत माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. नेटकऱ्यांना वाटते की, "आम्ही एकत्र आहोत, पण तसे काही नाहीये." गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांवर आता अखेरीस अहान पांडेने विराम लावला आहे. दोघांचे नातेसंबंध खूप घट्ट आहेत, पण ते रोमान्सचे नाहीत, असेही त्याने सांगितले.
अहान पांडे आणि अनीत पड्डाच्या रिलेशनशीपच्या रंगल्या चर्चा
मोहित सूरीचा 'सैयारा' चित्रपट १८ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. यानंतर अनेक फॅन पेजेसनी अहान पांडे आणि अनीत पड्डाचे 'एडिट्स' बनवले, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आणि लोकांनी या ऑनस्क्रीन कपलला रिअल कपल घोषित केले. 'सैयारा'चे मुख्य कलाकार खरोखरच एकमेकांना डेट करत आहेत, असे युजर्स तर्कवितर्क लावू लागले. त्यांची केमिस्ट्री इतकी दमदार होती की प्रेक्षकांना त्यांचे नाते खरे वाटू लागले. आपल्या मुलाखतीत अहान पांडेने सहकलाकारासोबतच्या आपल्या बॉन्डिंगबद्दलही भाष्य केले.
अहान म्हणाला, "आम्ही दोघांनी मिळून हे स्वप्न पाहिले होते आणि ते सत्यात उतरले. पाउलो कोएल्होची ही ओळ आम्हाला खूप आवडते की, स्वप्न सत्यात उतरण्याची शक्यताच जीवनाला अधिक मनोरंजक बनवते." यासोबतच अभिनेत्याने हे देखील सांगितले की, अनीत पड्डा त्याची गर्लफ्रेंड नाहीये, पण तिच्यासोबतचे नाते आहे तसं इतरांसोबत नाही आहे.
वर्कफ्रंटअहान पांडे आणि अनीत पड्डा या दोन्ही तरुण कलाकारांनी 'सैयारा'मधील त्यांच्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे आणि आता दोघेही त्यांच्या पुढील मोठ्या प्रोजेक्टच्या कामात व्यग्र आहेत. अहान पांडे अली अब्बास जफरच्या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे, तर अनीत पड्डा मॅडॉक युनिव्हर्ससोबत 'शक्ती शालिनी'साठी काम करणार आहे.