गुजराती टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मानसी पारेख(Manasi Parekh). गेल्याच वर्षी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. नुकतीच तिने एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने इंडस्ट्रीतील दबाव आणि सुंदर दिसण्यासाठी केली जाणारी कॉस्मेटिक सर्जरी, अनरिअलिस्टिक ब्युटी स्टँडर्ड्स यावरही भाष्य केलं. मानसी नक्की काय म्हणाली वाचा.
फ्री प्रेस जर्नलच्या चॅट शोमध्ये मानसी पारेख सहभागी झाली होती. यावेळी ती म्हणाली, "महिलांच्या सौंदर्यावर कायमच टिप्पणी केली जाते. त्यांचं सौंदर्याचं मोजमाप ठरवलं जातं. विशिष्ट वय झालं की तुम्हाला तुमच्या सुंदरतेवर लक्ष दिलं पाहिजे असं सर्रास म्हटलं जातं. जर तुम्ही कॅमेऱ्यासमोर काम करत असाल तर मग हा दबाव आणखी जास्त असतो. तुम्हाला तुमच्याच शरिरामध्ये काही ना काही कमीपणा दिसायला लागतो. मग तुम्ही सर्जरी करुन ते ठीक करायचा प्रयत्न करता. आजकाल तर खूप आधुनिक गोष्टी आल्या आहेत. मला वाटतं कॉम्सेटिक सर्जरी करण्यात काहीच चुकीचं नाही. ही ज्याची त्याची निवड आहे."
"पण जर तुम्ही लोक म्हणतायेत किंवा समाज नावं ठेवतोय म्हणून तुमच्या शरिराच्या एखाद्या भागाची सर्जरी करत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्हाला कोणाच्याही व्हॅलिडेशनची गरज नसली पाहिजे. जर तुम्हाला स्वत:हून वाटत असेल तर बिंधास्त करा. पण कोणा दुसऱ्याच्या सांगण्यावरुन करु नका."
मानसी पारेखला 'गुलाल' या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती 'सुमित संभाल लेगा' मालिकेतही दिसली. मानसी अभिनेत्रीसोबतच गायिका आणि निर्मातीही आहे. 'कच्छ एक्सप्रेस' या सिनेमासाठी मानसीला गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.