Vijay Raaz Sexual Harassment Case: अभिनेते विजय राज यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाच्या सेटवर एका सहकारी महिलेनं विजय राज यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी, १५ मे रोजी या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर गोंदिया मॅजिस्ट्रेट कोर्टाने विजय राज यांच्यावरील सर्व आरोप रद्द केले. पण या आरोपांमुळे विजय राज यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. त्यांना 'शेरनी' चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यावर सोडावं लागलं होतं, इतकंच नाही तर, या आरोपामुळे नंतर हातातील काही कामेही गेली होती.
न्यायालयाने विजय राज सन्मानपूर्वक निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने स्पष्ट केलं की, सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे आणि कमकुवत असून, आरोपीविरोधात कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही. ही घटना 'शेरनी' चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना मध्य प्रदेशातील बालाघाट येथे २५ ऑक्टोबर २०२० च्या रात्री ते २९ ऑक्टोबर २०२० च्या सकाळच्या दरम्यान घडली होती. तेव्हा अभिनेता आणि संपूर्ण टीम मध्य प्रदेशातील बालाघाट येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर गोंदियातील रामनगर पोलिस ठाण्यात विजय राज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिने आरोप केला होता की, अभिनेता विजय राज यांनी तिच्यासोबत अनुचित वर्तन केलं. या प्रकरणानंतर, ४ नोव्हेंबर २०२० रोजी विजय राज यांना अटक करण्यात आली होती, मात्र त्याच दिवशी त्यांना जामीनही मंजूर झाला होता.
दरम्यान, 'शेरनी'च्या एका क्रू मेंबरने बॉलिवूड हंगामाला घटनेच्या दिवशी घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या मते, सेटवर ३० लोक होते आणि ही घटना सर्वांसमोर घडली. क्रू मेंबरने सांगितले होते की, विजय राजने महिलेचा हात धरून ओढला होता, ज्यामुळे तिला राग आला. सोबतचं त्याने असंही सांगिलतं की, विजय राजने तिचा लैंगिक छळ किंवा छेडछाड केली नव्हती.
विजय राज आजही कलाविश्वात सक्रीय असून विनोदी भूमिकांसह त्याने काही आव्हानात्मक, गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. 'रन'मधील त्याची भूमिका कोणीही विसरणं शक्य नाही. या चित्रपटात कौआ बिर्याणी खाऊन हा अभिनेता विशेष चर्चेत आला होता. विनोदाचं उत्तम टायमिंग आणि विजय राजच्या चेहऱ्यावरील हावभाव यामुळे हा सीन चांगलाच गाजला होता. यासोबतचं ते 'स्त्री', 'डेढ इश्किया', 'गली बॉय' यांसारख्या चित्रपटांमधील कामासाठी ओळखले जातात.