दिग्गज अभिनेता टीनू आनंद (tinu anand) यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमधून काम केलं आहे. टीनू आनंद सध्या एका कारणामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. टीनू आनंद यांचा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये त्यांनी "भटक्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारलं पाहिजे", असं वक्तव्य केलं आहे. यामुळे टीनू यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं आहे. याशिवाय भटक्या कुत्र्यांनी त्यांच्या मुलीवर हल्ला केला, असाही खुलासा टीनू आनंद यांनी केला आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
टीनू आनंद यांच्या मुलीवर कुत्र्यांचा हल्ला
द फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत टीनू आनंद यांनी खुलासा केला की, "भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने माझ्या मुलीच्या मनगटाला जबर दुखापत झाली. गेले महिनाभर मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिच्या उपचारांचा खर्च ९० हजार झाला आहे. सोसायटीमध्ये मुलीच्या पाळीव कुत्र्यावर ३ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. तेव्हा कुत्र्याला वाचवण्यामध्ये मुलगी जोरात पडली आणि तिच्या मनगटाला मोठी इजा पोहोचली."
"मला डॉग लव्हर्स लोकांशी बोलायचं आहे. जर हे श्वानप्रेमी कुत्र्यांवर इतकं प्रेम करतात, त्यांना खाऊ घालतात, त्यांची काळजी घेतात तर त्यांच्यावर नियंत्रण का ठेऊ शकत नाहीत. मी ८० वर्षांचा आहे त्यामुळे कुत्र्यांनी जर माझ्यावर हल्ला केला तर मला स्वतःला वाचवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी कुत्र्यांवर हल्ला करण्यासाठी तर स्वतःला वाचवण्यासाठी ती कृती करतोय. या गोष्टीचा मला पूर्ण अधिकार आहे." अशाप्रकारे टीनू आनंद यांनी कुत्र्यांना हॉकी स्टीकने मारल्याच्या वक्तव्यावर त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे.