'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे. तसंच तिची गोड स्माईल भल्याभल्यांना घायाळ करते. ८० च्या दशकात माधुरीचं हिंदी सिनेसृष्टीवर राज्यच होतं. श्रीदेवी आणि माधुरी यांच्यात तर चांगलीच स्पर्धा असायची. अनिल कपूर, संजय दत्त, सलमान खान यांच्यासोबत माधुरीची जोडी खूप गाजली. तसंच तिच्या नृत्य कौशल्याचे आजही लोक चाहते आहेत. अशा या माधुरीवर एक अभिनेताही फिदा होता. त्याने चक्क तिच्यासाठी एका सिनेमात फुकट काम केलं होतं.
माधुरीच्या सौंदर्यावर घायाळ झालेला हा अभिनेता म्हणजे शेखर सुमन. १९८६ साली आलेल्या सिनेमात त्यांनी मानधन न घेता काम केलं होतं. हा किस्सा त्यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता. ते म्हणाले होते की, "मानव हत्या या सिनेमाची मला ऑफर आली होती. दिग्दर्शक सुदर्शन रतन यांनी मला याबाबत विचारलं होतं. पण त्यांनी या सिनेमासाठी एकही रुपया मानधन मिळणार नाही अशी अट ठेवली होती. ते ऐकून मला जरा आश्चर्यच वाटलं. मी विचारलं, 'नायिका कोण आहे?'तर सुदर्शन यांनी नाव सांगायला टाळाटाळ केली. मी म्हटलं, 'पैसे देत नाहीस, नायिकेचं नावही सांगत नाही, असं कसं चालेल?'
ते पुढे म्हणाले, "त्यानंतर त्याने माधुरी दीक्षित नाव सांगितलं. तिची आणि माझी भेट घडवून आणली. मी ज्याक्षणी माधुरीला पाहिलं घायाळच झालो. ती खूप सुंदर होती. जसं मी तिला पाहिलं तसंच थेट दिग्दर्शकाकडे गेलो आणि मी हा सिनेमा करतोय असं सांगितलं. माझं आणि माधुरीचं मुंबईतलं घर जवळ जवळच होतं. रोज सेटवर जाताना मी तिला बाईकवर घेऊन जायचो आणि संध्याकाळी शूट संपल्यावर परत घरी सोडायचो. त्या वेळी माझ्यासाठी पैशांपेक्षा तिच्यासोबत घालवलेला वेळ जास्त अमूल्य होता."