Abhishek Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांच संपूर्ण कुटुंब हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अमिताभ यांची नात आराध्याचे फोटो आणि व्हिडीओ तर सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. विश्वसुंदरी ऐश्वर्याची लेक आराध्या ही स्टार किड म्हणून खूप लोकप्रिय आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. आराध्या बच्चन ही कायम चर्चेत असते. अशातच आता एका मुलाखतीमध्ये आराध्याविषयी तिचे वडिल अभिषेक बच्चन यानं मोठा खुलासा केलाय.
अभिषेक बच्चन सध्या त्याच्या 'कालिधर लापता' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ४ जुलै २०२५ रोजी झी ५वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतंच त्यानं प्रसिद्ध पत्रकार नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत मुलगी आराध्या बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबाबत अनेक खास गोष्टी शेअर केल्या. अभिषेकने आराध्याच्या उत्तम संगोपनाचे संपूर्ण श्रेय ऐश्वर्याला दिलं. तो म्हणाला, "मला प्रत्येक गोष्टीचे श्रेय तिच्या आईला द्यावे लागेल. मला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि मी माझे चित्रपट बनवण्यासाठी बाहेर जातो. पण ऐश्वर्या आराध्याची पूर्ण काळजी घेते".
ऐश्वर्याबद्दल पुढे तो म्हणाला, "ती अद्भुत आहे. निःस्वार्थ आहे. हे सगळं मला खरंच विलक्षण वाटतं. मी सर्व आईंसाठी हेच म्हणेन की, वडील हे कामासाठी बाहेर असतात, उद्दिष्ट गाठण्यात गुंतलेले असतात. पण आई आपल्या संपूर्ण अस्तित्वासह मुलाला प्राधान्य देते. हे एखाद्या वरदानासारखं आहे. त्यामुळेच संकटाच्या काळात आपण सर्वप्रथम आपल्या आईकडेच जातो. आज आराध्या जशी आहे, त्यामागे ऐश्वर्याचं भक्कम योगदान आहे".
आराध्याबद्दल बोलताना अभिषेकनं खुलासा केली की तिच्याकडे फोनही नाही. त्याने सांगितलं की, ऐश्वर्याने या सर्व गोष्टींवर निर्बंध घातले आहेत. अभिषेक म्हणाला, "आराध्या एक समजूतदार मुलगी बनत आहे, स्वतःहून खूप काही शिकते आहे. तिची स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे आणि आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो. आराध्या ही आमच्या कुटुंबाचा आनंद आणि अभिमान आहे".
दरम्यान, ऐश्वर्याने २० एप्रिल २००७ रोजी अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०११ रोजी तिने मुलगी आराध्याला जन्म दिला. ऐश्वर्या आपल्या मुलीवर खूप प्रेम करते. आराध्या सध्या धीरूबाई अंबानी शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी आराध्या परदेशात जाणार अशी देखील चर्चा आहे. सेलिब्रिटी किड म्हणून देखील आराध्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.