Join us

"त्याला कायम लक्ष वेधून...", राहुल वैद्य-विराट कोहली प्रकरणावर अभिजीत सावंतची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 17:10 IST

तुझं राहुल वैद्यसोबत बोलणं होतं का?, अभिजीत सावंत म्हणाला...

गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) सध्या भलत्याच कारणामुळे चर्चेत आहे. विराट कोहली (Virat Kohli)  आणि त्याच्या चाहत्यांविरोधात बोलल्याने तो चर्चेत आला आहे. विराट कोहलीने आपल्याला ब्लॉक केलं इथपासून ते विराट आणि त्याचे चाहते जोकर आहेत इथपर्यंत त्याने अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या. यामुळे त्याला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. राहुलच्याच करिअरच्या सुरुवातीच्या काळातला त्याचा मित्र गायक अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

तुझं राहुल वैद्यसोबत बोलणं होतं का? राहुल वैद्यचं नक्की काय सुरु आहे? विराट आणि त्याच्या  चाहत्यांविरोधात तो जे बोलतोय याचे त्याला परिणाम भोगायला लागू शकतात का? या प्रश्नांची उत्तरं अभिजीत सावंतने नुकतीच दिली. हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "माझं आता राहुलशी खूप कमी बोलणं होतं. आम्ही फारसे संपर्कात नाही. त्याला कायम चर्चेत राहायला आवडतं. एखाद्या व्यक्तीला त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तरी फरक पडत नाही. पण राहुल वैद्य असा व्यक्ती आहे जो सतत लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न करतो. राहुलने विराट कोहलीविरोधात जे केलं त्याचे परिणाम नक्की होऊ शकतात. पण मला ती गोष्ट इतकी महत्वाची वाटत नाही. कोणी जर चुकीचं वागत असेल मग तो कितीही मोठा व्यक्ती असेल तर तुम्ही बोला. पण हे जे सुरु आहे त्याचा काहीच अर्थ नाही. बाकी कोणी तर बोलत नाहीए हाच एकटा बोलतोय."

दरम्यान राहुलने आजच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत विराटने आपल्याला अनब्लॉक केल्याचं लिहिलं आहे. तू सर्वात महान क्रिकेटपटू आहेस आणि भारताचा अभिमान आहेस असं त्याने पोस्टमध्ये लिहित विराट कोहलीचे गुणगान गायले. राहुल वैद्यने पलटी मारली अशा प्रतिक्रिया आता नेटकरी देत आहेत. दरम्यान राहुल वैद्य आणि विराट कोहलीमध्ये नक्की काय बिनसलं होतं हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

काय आहे हा वाद?

राहुल वैद्यने काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर आपल्याला ब्लॉक केल्याचा खुलासा केला होता. यानंतर त्याने सतत विराटवर निशाणा साधला. अवनीत कौरचा फोटो लाईक करण्यावरुन विराट सध्या चर्चेत होता. यावर अनेक मीम्सही बनवले गेले. विराटला अखेर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. चाहत्यांनी यावर विराटला पाठिंबा दिला. मात्र राहुल वैद्यने विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर्स आहेत अशी पोस्ट केली. यानंतर सतत तो 'सारी उम्र मै जोकर...' हे गाणं गातोय. नुकतीच अशी बातमी आली की विराटच्या चाहत्यांनी त्याच्या पोस्टरसमोर बकरीचा बळी दिला. ही बातमी शेअर करत राहुलने पुन्हा चाहत्यांना 'दो कौडी के जोकर्स' असं म्हटलं.

टॅग्स :अभिजीत सावंतसंगीतराहुल वैद्यविराट कोहली