'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणार आमिर खान (Aamir Khan) आणि लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांची जोडी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेली आहे. आमिर आणि राजकुमार हिरानी यांनी २००९ साली '3 इडियट्स' या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी 'पीके' हा सिनेमा केला. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. आता राजकुमार हिरानी आणि आमिरच्या आगामी सिनेमाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. आता आमिर आणि राजकुमार हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. यावेळी ते महाराष्ट्राच्या सुपुत्रावर बायोपिक घेऊन येत आहेत.
भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे, त्या व्यक्तिमत्वाची कथा सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडली जाणार आहे. होय, भारतीय सिनेमाचे जनक मानले जाणारे, महाराष्ट्राच्या सुपुत्र दादासाहेब फाळके ( Dadasaheb Phalke) यांच्यावर बायोपिक येत आहे. हा चित्रपट स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर घडणारी एका कलाकाराची विलक्षण संघर्षमय कहाणी मांडणार आहे. ज्याने शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात मोठ्या स्थानिक चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली.
या सिनेमाचं शूटिंग ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. 'सितारे जमीन पर'च्या प्रदर्शनानंतर आमिर खान लवकरच या भूमिकेसाठी तयारी सुरू करणार आहेत. चित्रपटासाठी लॉस एंजलिसमधील व्हीएफएक्स स्टुडिओंनी त्या काळातील युगदर्शक डिझाइन्स आधीच एआयच्या साहाय्याने तयार केली आहेत. या चित्रपटाच्या लेखनावर राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, हिंदुकुश भारद्वाज आणि अविष्कार भारद्वाज हे चार लेखक गेले चार वर्षे झाले काम करत आहेत.
विशेष म्हणजे, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसळकर यांनी या प्रकल्पासाठी आपला पूर्ण पाठिंबा दिला असून त्यांनी त्यांच्या आजोबांच्या आयुष्यातील अनेक खास आठवणी आणि प्रसंग शेअर केले आहेत. जे पटकथेसाठी अत्यंत मौल्यवान ठरत आहेत. राजकुमार हिरानी आणि आमिर खान या दिग्गज जोडीकडून येणारा हा चित्रपट भारतीय मनोरंजनसृष्टीत मैलाचा दगड ठरेल, हे नक्की.