Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेळेची किंमत केली नाही, बिग बींनाही पाहावी लागली वाट; गोविंदाला आज मागावं लागतंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 11:29 IST

अभिनेते शहजाद खान यांनी सांगितले गोविंदाचे किस्से, वेळेची किंमत न केल्यामुळे आज आली ही वेळ?

बॉलिवूडमध्ये 'चीची' या नावाने ओळखला जाणारा गोविंदा (Govinda) एकेकाळी डान्स आणि त्याच्या विनोदी अभिनयामुळे चर्चेत असायचा. सलग सुपरहिट सिनेमे द्यायचा. त्याच्यासोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक, निर्मात्यांची रांग लागायची. पण गोविंदा प्रसिद्धीच्या झोतात असताना सेटवर कित्येक तास उशिरा पोहोचायचा. इतकंच नाही तर त्याने अमिताभ बच्चन, रजनीकांत यांनाही वाट पाहायला लावली होती. गोविंदाच्या अनेक अशा किस्स्यांचा आता खुलासा झाला आहे.

हिंदी सिनेमांमध्ये कधी खलनायक तर कधी छोट्या भूमिका करणारे अभिनेते शहजाद खान (Shehzad Khan) यांनी नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन आणि गोविंदाच्या 'बडे मिया छोटे मिया' सिनेमाचे किस्से सांगितले. ते म्हणाले, "अमिताभ बच्चन सेटवर सकाळी ९ वाजता पोहोचायचे. पण गोविंदा सेटवर थेट संध्याकाळी ४ वाजता यायचा. पण दिग्दर्शक डेव्हिड धवन अतिशय हुशारीने अमिताभ बच्चन यांना व्यस्त ठेवायचे. जेणेकरुन त्यांचं गोविंदाच्या उशिरा येण्याकडे लक्ष जाणार नाही. डेव्हिड धवन खूपच कमाल दिग्दर्शक आहेत. मात्र गोविंदाच्या वागण्यावर आम्ही काय बोलणार. आम्ही तर कॅरेक्टर अॅक्टर होतो. "

ते पुढे म्हणाले, "चीची भैय्याचे खूप किस्से आहेत. एकदा आम्ही रामोजी फिल्म सिटीमध्ये शूट करत होतो. तेव्हा गोविंदा म्हणाला मी एअरपोर्टवर जाऊन नातेवाईकांना घेऊन येतो. नंतर आम्हाला कळलं की तो तर मुंबईला गेला होता. आणि दुसऱ्या दिवशी परत आला. जेव्हा तुमची चलती असते तेव्हा तुमच्या सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष केलं जातं."

यापूर्वी अॅक्शन दिग्दर्शक टीनू वर्मा यांनीही गोविंदाचा किस्सा सांगितला होता. गोविंदाने वेळेची किंमत कधीच केली नाही. 'हम' सिनेमाच्या शूटिंगवेळी गोविंदाने अमिताभ बच्चन आणि रजनीकांत दोघांना पाच दिवस वाट पाहायला लावली होती. एक तो काळ होता आणि आज गोविंदाला काम मागावं लागत आहे.

टॅग्स :गोविंदाअमिताभ बच्चनबॉलिवूडसिनेमा