शिक्षकाचा किंवा प्राध्यापकाचा बॉलीवूडशी तसा सरळ संबध येत नाही. मात्र, बॉलीवूडमधील काही कलावंत असे आहेत, ज्यांनी अध्यापनाचे कार्य सोडून या रूपेरी जगात प्रवेश केला व यशाची शिखरेही पादाक्रांत केली. लेखन व अभिनयात हातखंडा असणारे कादरखान हे बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी मुंबईच्या भायखळा येथील कॉलेजमध्ये व त्यानंतर पुण्यातील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये स्क्रिप्टरायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कादरखान यांच्या पूर्वी बलराज सहानी यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून बॉलीवूड गाठले. ते लाहोरच्या एका कॉलेजात शिकवायचे. बॉलीवूडमध्ये असतानाही ते अनेक वर्षांपर्यंत मुलांना शिकवित असल्याचे सांगण्यात येते. या मालिकेत अनुपम खेर यांचेही नाव घेता येईल. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी ते शिमल्यातील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत होते.यात केवळ अभिनेतेच नाही, तर अभिनेत्रींचाही समावेश आहे. आॅफबिट सिनेमातील आघाडीची अभिनेत्री नंदिता दास मुंबईत येण्यापूर्वी दिल्लीच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक होती. तुमचा विश्वास बसणार नाही, पण ग्लॅमरस चित्रांगदा सिंहदेखील या चंदेरी जगातात येण्याआधी डेहरादूनच्या एका शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देत होती. पडद्यामागील रचनाकारांचा देखील यात समावेश आहे. हैदराबाद विद्यापीठात प्राध्यापक असलेले मो. मोईनुद्दीन यांनी दिग्दर्शक इस्माइल श्रॉफ यांच्या अनेक चित्रपटांसाठी संवाद लेखन केले. विशेषत: त्यांनी ‘जानी’ राजकुमारसाठी लिहिलेले संवाद विशेष गाजले. राजकुमार यांची बहीण कृष्णा राज पंडित हिने आपल्या भावाच्या ‘इतिहास’ या चित्रपटासाठी संवाद लेखनाचे काम केले. त्या वेळी त्या दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. असे अनेक कलावंत शिक्षकी पेशातून बॉलीवूडमध्ये आले आहेत. - anuj.alankar@lokmat.com
प्राध्यापकाची नोकरी सोडून गाठले बॉलीवूड
By admin | Updated: January 25, 2016 01:07 IST