सध्या बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नाचं धामधूमीचं वातावरण सुरु झालंय. अशातच हिंदी सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री रंजनिनी चक्रवर्तीने (ronjnini chakraborty) लग्न केलंय. अभिनेता आशिष वर्मासोबत (ashish verma) रंजनिनिने लग्न केलं आहे. अनेक वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर या दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. रजिस्टर मॅरेज करुन अत्यंत साध्या पद्धतीने रंजनिनि बॉयफ्रेंड आशिषसोबत विवाहबंधनात अडकली.
१४ दिवसांनी केला लग्नाचा खुलासा
रंजनिनिने लग्नाचे काही खास क्षण इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघंही पारंपरिक पोशाखात अतिशय सुंदर दिसत आहेत. लग्न समारंभ अतिशय खास आणि जवळच्या मित्र-परिवाराच्या उपस्थितीत पार पडला. याशिवाय आशिष-रंजनिनिच्या लग्नाला कोणताही बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित होता. आशिष आणि रंजनिनि या दोघांचे लग्नाचे फोटो समोर येताच त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करुन दोघांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रंजनिनिचा नवराही अभिनेता
रंजनिनीचा नवरा आशिष हा सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी सिनेमांमध्ये कार्यरत आहे. आशिष वर्मा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' चित्रपटामुळे चर्चेत आला होता. हे दोघं गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी रजिस्टर पद्धतीने आणि साधेपणाने लग्न करुन एकमेकांसोबत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.