छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 3) तिसरा सीझन खूप चर्चेत आला होता. या सीझनमधील सर्व सेलिब्रेटींचीही खूप चर्चा झाली. या शोमधील स्पर्धक जय दुधाणे (Jay Dudhane)आणि स्नेहा वाघ (Sneha Wagh) यांचे नाते खूप चर्चेत आले होते. मात्र स्नेहा शोमधून बाहेर पडल्यानंतर तिच्या मागून जयने केलेले विधान ऐकून ती खूप दुःखी झाली होती. त्यामुळे त्या दोघांच्या नात्यात दुरावा आलेला पाहायला मिळाला. दरम्यान या सीझनमधील स्पर्धक जय दुधाणेने सहस्पर्धक मीरा जगन्नाथ (Meera Jagannath )सोबत लग्न केल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. त्यांचा लग्नाच्या गेटअपमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
खरंतर जय दुधाणे आणि मीरा जगन्नाथ यांचा लग्नाच्या गेटअपमधील व्हायरल होणारा फोटो त्यांच्या पहिल्या म्युझिक अल्बममधला आहे. ते दोघे पहिल्यांदाच म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र आले आहेत. "जोडी दोघांची दिसते चिकनी" असे या अल्बमचे नाव आहे. सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांनी "जोडी दोघांची दिसते चिकनी" या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. तर बीना राजाध्यक्ष सहनिर्मात्या आहेत. केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे या नव्या दमाच्या गायकांनी हे गाणं गायलं आहे. राजेंद्र वैद्य कल्याणकर यांच्या शब्दांना अमेय मुळे यांनी स्वरसाज चढवला आहे. जोडी दोघांची दिसते चिकनी, कोलीवाऱ्याची राजा नी राणी असे शब्द असलेलं हे गाणं अतिशय श्रवणीय आहे. सहजपणे ओठी रुळणारे आणि उडती चाल ही गाण्याची वैशिष्ट्यं आहेत.
एमटीव्हीवरच्या स्प्लिट्सव्हिला या रियालिटी शोच्या तेराव्या सीझनमधून जय दुधाणे प्रकाशझोतात आला. देखणा आणि उत्तम शरीरयष्टी असलेल्या या अभिनेत्याने बिग बॉस मराठी ३च्या अंतिम फेरीत मजल मारून उपविजेतेपद मिळवले. तर मीराने माझ्या नवऱ्याची बायको आणि येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकातून आपला अभिनय प्रवास सुरू केला. बिग बॉसमध्ये मीराचाही समावेश होता. बिग बॉसचा सीझन संपल्यानंतर मीरा आणि जय पहिल्यांदाच म्युझिक व्हिडिओतून एकत्र झळकले आहेत.